विशेष

तत्काळ उपचारांमुळे १ हजार जणांना जीवनदान, आषाढीत नऊ लाख वारकऱ्यांची आरोग्य सेवा

पंढरपूर – आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागाने ९ लाख २३ हजार ५०९ वारकऱ्यांना आतापर्यंत आरोग्य सेवा पुरविली असून, परतीच्या वारीमध्येही 10 जुलैपर्यंत विभागामार्फत वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. पालखी मार्गावर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत आतापर्यंत एकूण १ हजार ११४ वारकऱ्यांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे. त्यामुळे या वारकऱ्यांना जीवनदान मिळाले आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविली. या उपक्रमाच्या माध्यमातून पालखी मार्गावर आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, आरोग्य संदर्भ सेवा देण्यात आली. ५ चित्ररथांच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी विभागामार्फत नावीन्यपूर्ण व कल्पक पद्धतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. वारकऱ्यांना पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.
त्यासाठी विभागाचे ४ हजार ३७६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ रात्रंदिवस कार्यरत होते.

पालखी मार्गावर वारीमध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सहायक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाईगार अशा सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर ‘आपला दवाखाना’ तात्पुरता उभारण्यात आला होता. तातडीच्या आरोग्य सेवेसाठी फिरत्या दुचाकी वाहनासह आरोग्यदूत तैनात ठेवण्यात आले होते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील ३ लाख ५६ हजार ३८९ वारकऱ्यांना, श्री संत तुकाराम महाराज पालखीत २ लाख २९,हजार १८३ तर श्री संत सोपानकाका महाराज पालखी दरम्यान १९ हजार ३६४ वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मानाच्या इतर पालख्या व दिंड्यांमध्ये ८५ हजार ३८६ वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली आहे. पंढरपूर – संस्था व एचबीटी (बूथ) मध्ये ६२ हजार ६७० वारकऱ्यांना, पंढरपूर – उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा आयसीयूमध्ये ८६ हजार ९२२ तसेच तीन रस्ता शिबिरामध्ये ८३ हजार ५९५ वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. आरोग्य सेवा पुरविण्यात आलेल्या बाह्यरुग्ण संख्या ९ लाख १८ हजार ४९९ तर आंतररुग्ण संख्या ५ हजार ०१० अशी एकूण ९,२३,५०९ वारकरी भक्तांना आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close