मुंबई- हैद्रबाद बुलेट ट्रेन सोलापूर जिल्ह्यातील 62 गावांतून जाणार, सर्वाधिक अठरा गावे पंढरपूर तालुक्यातील, सामाजिक सर्व्हेक्षणास सुरूवात
पंढरपूर -721 किलोमीटर लांबीचा असणारा मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग सोलापूर जिल्ह्यात माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या सहा तालुक्यातील 62 गावांतून जाणार असून याबाबत सध्या उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात सामाजिक सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.
द्रुतगती रेल्वे महामंडळाने देशात विविध ठिकाणी बुलेट ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला असून यात मुंबई- हैदराबाद या 721 किलोमीटर लांबीचा हायस्पिड रेल कॉरिडॉर म्हणजेच बुलेट ट्रेनचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालय भारत सरकारकडून मंजूर झाला आहे. या रेल्वेचा मार्ग मुुंबई, नवी मुंबई, पुणे, सोलापूर जिल्हा यानंतर कर्नाटक व तेलगंणा असा आहे. सोलापूर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 62 गावांतून जाणार आहे. यासाठी 17.5 मीटर रुंद जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार असून सदर जागेत येणार्या शेतकर्यांच्या जमिनीसाठी होणार्या सामाजिक परिणाम व पुनर्वसन यासाठी सध्या दोन तालुक्यातून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार्या तालुक्यातील गावांची नावे माळशिरस ः भांबुर्डे, पळसमंडळ, तिरवंडी, चाकोरे, कोंडबावी, बागेचीवाडी, गिरझणी, चोंडेश्वरवाडी, दत्तनगर, वेळापूर, उघडेवाडी, धानोरे, तोंडले. एकूण गावे 13
पंढरपूर ः शेंडगेवाडी, केसकरवाडी, धोंडेवाडी, सुपली, भंडीशेगाव, उपरी, गादेगाव, कोर्टी, टाकळी, कासेगाव, गोपाळपूर, अनवली, कोंढारकी, रांजणी, आंबे, सरकोली, सवतगव्हाण, पुळूजवाडी. एकूण 18
मोहोळ ः वडदेगाव, कोथाळे, सोहाळे, वाघोली, कुरूल, कामती बुद्रूक, लमाण तांडा, कामती खुर्द, शिंगोली, तरटगाव. एकूण गावे 10
उत्तर सोलापूर ः तिर्हे, पाथरी, बेलाटी, कवठे, सलगर वाडी, प्रतापनगर, सोरेगाव, कुमठे. एकूण गावे 8
दक्षिण सोलापूर ः सावतखेड, होटगी, हणमगाव, वळसंग. एकूण गावे 4
अक्कलकोट ः कर्जाळ, कोन्हाळी, हसापूर, अक्कलकोट (ग्रामीण), ममदाबाद, निमगाव,हत्तीकणबस, चिक्केहळ्ळी, सलगर या गावांचा समावेश आहे. एकूण गावे 9.
मुंबई हैद्राबाद बुलेट ट्रेनसाठी हवाई सर्व्हेक्षण सुरू असून यासाठी हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली जात आहे. मध्यंतरी सोलापूर येथून यास सुरूवात करण्यात आली होती. केंद्र सरकारची ही महत्वकांक्षी योजना आहे. ही बुलेट ट्रेन कोणकोणत्या गावातून जाणार याबाबत उत्सुकता होती. दरम्यान हवाई सर्व्हेक्षणा अंतिम अहवाल आल्यावर यावर शिक्कामोर्तब होईल आता सध्या जो प्रस्तावित मार्ग आहे येथील सामाजिक सर्व्हेक्षणास सुरूवात झाली आहे. यासाठी एजन्सी नेमण्यात आली.