आंदोलन करणारे नातेपुते, अकलूजकर गार्हाण घेवून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दरबारी

मुंबई – अकलूज, माळेवाडी (अकलूज) या ग्रामपंचायतींचे नगरपालिकेमध्ये व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर व्हावे या मागणीसाठी आज मुंबई राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस , महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , विधानपरिषदेचे सदस्य आ.रणजितसिंह मोहिते पाटील, भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, अकलूजचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, नातेपुते ग्रामपंचायतीचे उपसरपंच अतुल पाटील, मामा पांढरे, माळेवाडी अकलूज ग्रामपंचायतीचे जालिंदर फुले हे उपस्थित होते.
अकलूज, माळेवाडी व नातेपुतेचे नागरिक गेल्या महिनाभरापासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल असून येत्या तीन आठवड्यात राज्य सरकार या विषयी आपला निर्णय घेईल असे नगरविकास विभागाने न्यायालयात सांगितले आहे. सध्या रोज वेगवेगळ्या पध्दतीची आंदोलन अकलूजमध्ये होत आहेत.
या आंदोलनादरम्यान राज्यपालांना भेटण्याचा निर्णय आंदोलकांनी जाहीर केला होता. त्यानुसार मंगळवारी राज्यपालांची भेट घेण्यात आली.
