राज्य
मराठा सांस्कृतिक भवनासाठी आवश्यक तेवढा निधी देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

पंढरपूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनासाठी शासनाने 5 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यासाठी आणखीन 10 कोटी रुपये देण्यात येतील. निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पंढरपुरातील भक्तीमार्गावर बांधण्यात येणार्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री . शिंदे बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार भरत गोगावले, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर उपस्थित होते.
विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालून शासन सर्व घटकांसाठी काम करत आहे. आषाढी वारीनंतर पंढरपूर शहर स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर ठेवावे, अशा सूचना देवून वारकर्यांनी परतीचा प्रवास सुरक्षित करावा, गडबड करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले असून पंढरपूर नगरी भक्तीरसात नाहून निघाली आहे. वारकर्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
