सातारा जिल्हा परिषद नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

मुंबई – सातारा जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त अध्यक्षा प्रियाताई महेश शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. याबाबतची पोस्ट सोशल मीडियात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक राज्यभर प्रचंड गाजली असून येथे भारतीय जनता पक्ष व महायुती मधील घटक पक्ष असणारी शिंदे शिवसेना आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. अनेक नाट्यमय घडामोडी या निवडीच्या वेळी पहावयास मिळाल्या. साताऱ्याच्या या घटनेचे पडसाद महायुतीमध्ये ही पहावयास मिळाले असून शिवसेना व भाजपमध्ये सध्या ताण तणावाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. विधानसभा व विधान परिषदेतही या विषयावर चर्चा झाली आहे. बहुमत नसतानाही भाजपने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणले आहे.या पार्श्वभूमीवर नूतन पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रियाताई शिंदे यांची अध्यक्षपदी तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
याविषयी सोशल मीडियात पोस्ट करताना मंत्री जयकुमार गोरे यांनी लिहिले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे पुढील वाटचालीला नवी ऊर्जा, नवी दिशा मिळणार असून सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली मिळाली ,अशी भावना, नवनिर्वाचित अध्यक्ष , जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष पंचायत समिती सदस्य यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद स्तरावर राबवण्यात येणाऱ्या विकासकामांना या सक्षम नेतृत्वातून अधिक बळ मिळेल आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारी कार्यपद्धती अधिक गतिमान होईल, असा विश्वास आहे..
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे, सातारा जिल्हा माजी अध्यक्ष तथा सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण (आबा) गोरे, युवानेते नीलेश माने, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, सातारा जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण साहेब, खटाव पंचायत समिती उपसभापती रेश्माताई शेडगे,खटाव पंचायत समिती सदस्य हनमंत बोटे,पंचायत समिती सदस्य शशिकांत रोमन यांच्यासह सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.




