“भाजप” विरुद्ध नाही तर शिंदे व परिचारक या प्रस्थापितांविरुद्ध लढाई

माढा व पंढरपूर तालुका
घड्याळावर निवडणूक लढवणार : आमदार पाटील
पंढरपूर – माढा व पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आमची लढाई भाजपशी नसून प्रस्थापित शिंदे व परिचारक या गटाविरोधात आहे असल्याचे स्पष्ट केले.
शनिवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच जिल्ह्यातील आमदार अभिजीत पाटील , राजू खरे, उत्तमराव जानकर, नारायण पाटील यांनी घेतली होती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढणार आहेत. याची तयारी आता सोलापूर जिल्ह्यात सुरू झाली असून आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माढा व पंढरपूर तालुक्यामध्ये आम्ही घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत. विधानसभेला जे नेते आमच्या सोबत होते त्या सर्वांना बरोबर घेऊन या निवडणुका लढवणार आहोत. आमची लढाई ही भाजप विरुद्ध नसून माढ्यात शिंदे व पंढरपूर तालुक्यात प्रस्थापित असणाऱ्या परिचारक गटाविरुद्ध आहे.
आपल्यावर भाजपचा अथवा पालकमंत्र्यांचा कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट करत आमदार अभिजित पाटील यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणे हे या मतदारसंघांमध्ये सोयीस्कर असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. माळशिरस चे आमदार उत्तमराव जानकर यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याने पक्षांमध्ये दुफळी असल्याचे चित्र निर्माण झाले होते. यावर बोलताना आमदार पाटील यांनी स्पष्ट केले की , त्यांना त्यांच्या भागात तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणे सोयीचे असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असावा.




