राज्य

माळशिरसमध्ये अँटी करप्शनची मोठी कारवाई, डीवायएसपींच्या नावाने 25 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी दोघांना अटक, पोलीस हवालदारांसह चौघांवर गुन्हा दाखल

अकलूज – सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी मोठी सापळा कारवाई केली आहे. अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि नंतर अटकपूर्व जामीन व कलमे न लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) यांच्या नावाने तब्बल 25 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी दोन खासगी इसमांना 5 लाख 50 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

लाचलुचपत विभागाच्या पुणे कार्यालयाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार ही कारवाई  २८ ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता माळशिरस येथे पालखी महामार्गावरील पिलीव रोडच्या ब्रिजखाली, जानकर प्लॉट शेजारी करण्यात आली.

तक्रारदार (पुरुष, वय 37, व्यवसाय- लायसन्स कन्सल्टंट) यांनी दि. 21 ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती की, त्यांचे भाऊ व इतरांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी लोकसेवक अनिल शिंदे (पोलीस हवालदार, ब.नं. 1659, नेमणूक नातेपुते पोलीस स्टेशन, सध्या उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज) याने स्वतःसाठी व उप विभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्यासाठी 25 लाख रुपयांची लाच मागितली.

तक्रारदाराने नकार दिल्यानंतर त्यांच्या भाऊ व इतरांविरुद्ध अकलूज पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. 564/26 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी लोकसेवक अनिल शिंदे यांनी खासगी इसम आबा वळकुंदे याच्या मोबाईलवरून तक्रारदाराशी संपर्क साधून “तुम्ही जर अगोदर 25 लाख दिले असते तर गुन्हा दाखल झाला नसता” असे सांगून त्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आणि PC & PNDT चे कलम न लावण्यासाठी तपास अधिकारी डीवायएसपी संतोष वाळके यांच्यासाठी 25 लाख व काम झाल्यानंतर स्वतःसाठी 5 लाख अशी मागणी करून 10 लाख रुपये स्वीकारल्याची तक्रार ACB पुणे येथे देण्यात आली.

दि. 24 ऑगस्ट रोजी केलेल्या पडताळणीत खाजगी इसम आबा वळकुंदे याने 25 लाखांची मागणी केल्याचे व 10 लाख स्वीकारल्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर दि. 27 ऑगस्ट रोजीच्या पडताळणीत आबा वळकुंदे व महादेव माने यांनी तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करण्यासाठी व BNSS 35 (3) अन्वये नोटीस देण्याचे सांगतो, असे सांगून तपास अधिकारी डीवायएसपी वाळके यांच्यासाठी 5 लाख व पोलीस राहुल वाघ यांच्यासाठी 50 हजार अशा एकूण साडेपाच लाख रुपयांची मागणी केली व दुसऱ्या दिवशी रक्कम घेऊन येण्यास सांगितले. यास पोलीस हवालदार राहुल वाघ यांनी अपप्रेरणा दिल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार पुणे युनिटने सापळा रचून खाजगी इसम आबा सावळा वळकुंदे (वय 48, रा. वळकुंदे मळा, 61 फाटा, ता. माळशिरस) आणि महादेव पंढरी माने (वय 39, रा. मोटेवाडी, ता. माळशिरस) यांना तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करता नोटीस देण्यासाठी लोकसेवक राहुल वाघ यांच्याकरिता साडेपाच लाख रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7अ, 12 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी नं. 1 व 2 यांना दि. 29 ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.

या गुन्ह्यात एकूण 4 आरोपी आहेत –
1) आबा वळकुंदे (खासगी इसम)
2) महादेव माने (खासगी इसम)
3) अनिल महादेव शिंदे (पोलीस हवालदार, उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज)
4) राहुल मारुती वाघ (पोलीस हवालदार, माळशिरस पोलीस स्टेशन)

सापळा अधिकारी –  निता मिसाळ, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.
पर्यवेक्षण –  सतीश वाळके, पोलीस उपअधीक्षक, पुणे.
सापळा पथक – मिथुन म्हात्रे, राजेश बाटे, प्रवीण तावरे, अश्विन कुमकर, दगडू सोनावणे, चंद्रकांत कदम.
मार्गदर्शन – पोलीस अधीक्षक  शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक  अजित पाटील, ला.प्र.वि. पुणे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close