पंढरपूर – गेल्या काही दिवसापासून घाटमाथा भीमा खोरे व पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरण हळूहळू वधारत आहे. सोमवारी आठ जुलै रोजी सायंकाळी हा प्रकल्प वजा 38.13 टक्के अशा स्थितीमध्ये होता.
दरम्यान दौंड जवळ उजनीत 5 हजार 410 क्युसेकने पाणी मिसळत आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उजनी जलाशयावर 37 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. धरणात एकूण पाणीसाठा हा 43.23 टीएमसी इतका असून धरण अद्यापही मृतसाठ्यामध्ये आहे. हा प्रकल्प उपयुक्त पाणी पातळीत भरण्यासाठी अद्याप 20.43 टीएमसी पाण्याची गरज आहे.
मागील वर्षी 2023 ला याच तारखेला धरण वजा 36.14% अशा स्थितीमध्ये होते. 2023 या पावसाळ्या हंगामात कमी पाऊस पडल्यामुळे उजनी धरण 60 टक्के भरले होते. तर जानेवारी 2024 मध्ये हा प्रकल्प मृतसाठ्यात पोहोचला होता. यंदा पावसाळा सुरू होताना उजनी धरण वजा 59.99% अशा स्थितीमध्ये होते. मात्र सात जून पासून सुरू झालेल्या पावसामुळे धरणात जवळपास एकवीस टक्के पाणीसाठा वाढलेला आहे.
मागील काही दिवसांपासून भीमा खोऱ्यामध्ये पावसाची नोंद आहे. मागील 24 तासातही अनेक धरणांवर पावसाची नोंद असून यात पवना धरणावर 25 मिलिमीटर मुळशी 22 , टेमघर 20 , वरसगाव 16 , पानशेत 13,0 डिंभे 11, वडज 10, कलमोडी 8 मि्.मी. तर निरा खोऱ्यातील देवघर 8, गुंजवणी 12, भाटघर धरणावर 2 मिलिमीटर पावसाची नोंद होती.
Back to top button