राज्य

उजनीत येणारी आवक मंदावली, विसर्ग कमी केला

पंढरपूर – भीमा खोरे, घाटमाथा परिसरातील पाऊस मंदावल्यामुळे उजनी धरणात येणारी पाण्याची आवक ही 13 हजार क्युसेक इतकी मंदावली असल्याने आता धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये 21 हजार सहाशे क्युसेक चा विसर्ग दुपारी सुरू ठेवण्यात आला होता.

आवक मंदावल्यास आणखीन विसर्ग कमी होणार आहे. उजनी धरण आता 104.24 टक्के उपयुक्त पाणी पातळीत भरले असून मागील दोन-तीन दिवसांपूर्वी हा प्रकल्प 108 टक्क्यांपर्यंत भरला होता. मात्र उजनीत दौंड जवळून येणारी वाढती आवक पाहता धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडावे लागले आहे. अद्यापही पावसाळा सुरू असल्याने भीमा खोऱ्यात पर्जन्यवृष्टी झाल्यास पुन्हा दौंडची आवक वाढू शकते हे लक्षात घेता जलसंपदा विभागाने उजनीत पाणी साठवण क्षमता तयार करून घेतली आहे

सध्या धरणातून सीना माढा , दहिगाव, भीमा सीनाजोड कालवा , मुख्य कालवा तसेच वीज निर्मितीसाठी पाणी सोडले जात आहे. मागील आठवड्यात निरा व भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्याने वीर आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागले होते.

उजनी धरण व्यवस्थापनाने योग्य नियोजन करत व वीर धरणातील विसर्ग पाहून नदीत पाणी सोडल्याने भीमाकाठी पूरस्थिती निर्माण झाली नाही. उजनी व वीर च्या पाण्याने भीमा नदीत एक लाख पस्तीस हजार क्युसेकने काही काळ वाहिली. मात्र यानंतर उजनीतून पाणी सोडण्याचे प्रमाण कमी करण्यात आले. याचबरोबर निरा खोऱ्यातही पाऊस मंदावल्याने वीरचा विसर्गही बंद झाला होता.

या काळात उजनी धरणातून एक लाख 25 हजार क्युसेकपर्यंत पाणी सोडावे लागले होते. घाटमाथा व भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे दौंडची आवक सतत वाढत राहून ती दोन लाख क्युसेकच्या पुढे गेली होती. यामुळे धरणातून निसर्ग वाढवणे अपरिहार्य होते. यातच हा प्रकल्प वेगाने भरला. पाऊस मंदावल्यानंतर दौंडची आवकही कमी झाले व धरण व्यवस्थापनाने भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये टप्प्याटप्प्याने कपात करत हा विसर्ग आता 20 हजार क्युसेक इतका ठेवला आहे. धरण 104 टक्के भरले असून यामध्ये अद्यापही सात टक्के पाणी आणखी साठवता येते. याचबरोबर विविध योजनांसाठी ही पाणी सोडणे सुरू असल्याने याचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील सिंचनाला देखील होत आहे.

भीमा खोऱ्यात पाऊस मंदावल्याने वरील धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी आता बंद करण्यात आले आहे. यामुळे उजनीतली आवक मंदावली आहे. भीमा व निरा खोऱ्यातील महत्त्वाचे प्रकल्प हे क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत तर काही धरण 100 टक्के भरलेली आहेत.

मागील वर्षी 2023 ला भीमा खोऱ्यात कमी पाऊस झाल्यामुळे तेथील प्रकल्प उशिरा भरले होते. तर उजनी केवळ 60 टक्के भरू शकली होती. यंदा मात्र पर्जन्यराजाने चांगली साथ दिल्याने उजनीसह सर्व धरण झपाट्याने भरू लागलेली आहेत. उजनी धरणात एकूण पाणीसाठा 119.50 टीएमसी इतका अ

असून यातील उपयुक्त पाणी हे 55.84 टीएमसी इतके आहे. मागील 24 तासात उजनी जलाशयावर 15 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून या पावसाळा हंगामात उजनीवर एकूण 297 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close