Breaking News: माढा सबजेलमधून गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींचे पलायन
माढा – येथील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या सबजेल मधून सोमवारी १९ जुलै रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींनी पलायन केल्याची घटना घडली असून पळून गेलेल्या आरोपीना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पलायन केलेले चौघेही आरोपी न्यायालयीन कोठडीत होते त्यांची नावे व गुन्ह्याचे आरोप कंसात पुढील प्रमाणे :सिध्देश्वर शिवाजी केचे, (बनावट चलनी नोटा) अकबर सिध्दाप्पा पवार, (बेकायदेशी हत्यार बाळगणे) आकाश उर्फ अक्षय राॅकी भालेकर, (खुनाचा गुन्हा) तानाजी नागनाथ लोकरे( पोक्सो) अशी आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपी अकबर पवार यास फीट येत होती.यापूर्वीही त्याला दोनवेळा फीट आली होती. त्यामुळे त्याला माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात न्यावे लागले होते. आज सोमवारी सकाळीच त्याने फीट आल्याचे सोंग केले, बंदोबस्तावरील पोलिसांना ते खरे वाटले त्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी जेलचा दरवाजा उघडताच आरोपींनी पोलिसांना धक्का मारून पलायन केले. या आरोपींवर खून, बनावट चलनी नोटा, पोक्सो, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. यातील दोन आरोपी हे कुर्डूवाडी तर दोन आरोपी हे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यातील आहेत.
आरोपींचे पलायन झाल्याचे समजताच पोलिसांनी नाकाबंदी करीत आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
माढा सबजेलच्या सुरक्षेबाबत मिळालेली माहिती अशी की या सबजेलमध्ये कुर्डूवाडी,टेंभुर्णी आणि माढा पोलीस ठाण्याकडील आरोपी असतात. येथे कुर्डूवाडी आणि टेंभुर्णी या दोन पोलिस ठाण्याकडील प्रत्येकी एक कर्मचारी सुरक्षेसाठी नियुक्त केलेले असतात. तर माढा पोलीस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी गार्डावर नियुक्त केलेले असतात असे असताना हे चार आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाल्याने तो एक चर्चेचा विषय झाला आहे. यापूर्वीही गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळून जाण्याच्या घटना येथे घडल्या आहेत.