काय म्हणावं ; संचारबंदीमुळे वारकरी, पंढरपूरकर घरातच, रस्त्यावर मुख्यमंत्र्यांच्या स्वागताच्या डिजिटल फलकांची गर्दी !
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अत्यंत संवेदनाशील म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांनी कोरोनाकाळात नेहमीच जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. वारकरी व पंढरपूरकरांचे आरोग्य लक्षात घेवून वेळोप्रसंगी अनेकांचा विरोध पत्करून कठोर निर्णय घेतले आहेत. राज्याच्या प्रमुखाने आषाढी एकादशीची महापूजा करावी अशी प्रथा व परंपरा असून ती पाळण्यासाठी ते पंढरीत येत आहेत. मागील वर्षी ते स्वतः गाडी चालवत पंढरपूरला आले होते. त्यांनाही पंढरीत संचारबंदी आहे याची माहिती आहे. अशावेळी विना वारकरी भरणार्या या सोहळ्यासाठी इतकी पोस्टरबाजी त्यांना रूचेल काय?
पंढरपूर- कोरोना विषाणूचे थैमान मागील 16 महिन्यांपासून जगभरात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर येथेही सर्वच सण, उत्सव यंदाची आषाढी वारी प्रतीकात्मक साजरी होत आहे. सलग दुसर्या आषाढी यात्रेवर याचा परिणाम झाला असून पंढरीत आठ दिवस संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अशा निर्मनुष्य रस्त्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
सलग दुसर्या आषाढी वारीस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे श्री विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी येत आहेत. परंतु मागील वर्षीप्रमाणे यंदा ही वारी भरलेली नाही. यावर्षी तर आठ दिवस संचारबंदी जाहीर झाल्यामुळे नागरिकांसह व्यापार्यांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. दरम्यान संचारबंदीच्या पहिल्या दिवशी शहरातील सर्व प्रमुख रस्ते निमर्नुष्य होते, वाळवंटात नीरव शांतता होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेल्वे पुलापर्यंतच्या रस्ता दुभाजकावर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या एका आमदार महोदयाचे छायाचित्र असलेली भली-मोठी डिजिटल लावली आहेत. एक ही वारकरी पंढरीत नाहीत तर अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर पडलेले तुरळक नागरिक वगळता या दीड किलोमीटरच्या रस्त्यावर कोणासही फिरकू दिले जात नाही. परंतु मुख्यमंत्र्यांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी रस्ता दुभाजकावरील एकही वीजेचा खांब या डिजिटलमधून सुटलेला नाही हे विशेष. यासह छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील स्वागताच्या फलकांची गर्दी झाली असून वीस फुटाचे मुख्यमंत्र्यांचे भव्य डिजिटल उभारणीची तयारी सुरू होती. येथूनच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंगळवारी पहाटे शासकीय महापूजेसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात जाणार आहेत.
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेस उध्दव ठाकरे सहकुटुंब येणार असल्याने सदर आमदार महोदयांच्या कार्यकर्त्यांनी असे जंगी स्वागत करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या महापूजेस मंदिरात ठाकरे कुटुंबियाशिवाय कोणासही प्रवेश दिला जाणार नाही. दरम्यान सदर फलक लावताना नियमाला बगल देण्यात आली आहे काय? असा प्रश्न निर्माण होत असून नगरपरिषदेच्या ठरावानुसार रस्ता दुभाजकाच्या मधोमध फलक लावण्यास मनाई आहे. तसेच पालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणीच डिजिटल लावणे बंधनकारक आहे. परंतु या सर्व नियमांकडे सत्ताधारी असल्यानेच संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे की काय? असा प्रश्न संचारबंदीमुळे घरातच बसलेले वारकरी ,नागरिक व व्यापारी विचारत आहेत.