राजकिय

माढा लोकसभा | मतदारसंघाचा कानोसा घेत मोहिते पाटलांनी सस्पेन्स संपवला


पंढरपूर –  माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या अकलूजच्या धैर्यशीला मोहिते पाटील यांनी मतदारसंघाचा कल जाणून घेतला व यानंतर गुरूवारी शरद पवार यांची पुण्यात भेट घेवून 14 एप्रिल दरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत  त्यांचा पक्षप्रवेश होणार असून 16 एप्रिल ला ते माढा लोकसभेची उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे. दरम्यान मोहिते पाटील यांनी सस्पेन्स संपवत गुरूवारी पवार यांची भेट घेतली व निर्णय सांगितला. त्यांच्यासमवेत शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख तसेच प्रवीण गायवाकड होते. पवार यांनीच मोहिते पाटील हे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील , असे जाहीर केले आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून तुतारी हे चिन्ह मोहिते पाटील समर्थकांनी मतदारसंघात रूजवले होते. जयसिंह मोहिते पाटील हे उघडपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात आम्ही जाणार असे सांगत होते मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी मौन बाळगले होते.
मागील पंधरा दिवसात मोहिते पाटील कुटूंबातील सदस्यांनी माढा लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. अद्यापही त्यांचे गावभेट दौरे सुरू आहेत. सध्याची ग्रामीण भागातील स्थिती पाहता मोहिते पाटील यांना शरद पवार यांच्या पक्षाकडूून निवडणूक लढविण्याचा आग्रह होत होता. याच दरम्यान त्यांच्या प्रत्येक बैठकीत व कार्यक्रमांमध्ये तुतारी वाजवली जात होती. मोहिते पाटील यांनी पक्षप्रवेश करण्यापूर्वीच चिन्ह रूजवले असल्याचे चित्र आहे. दरम्यान गुरूवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतरही माध्यमांना भेटी विषयी काही सांगितले नाही. वेट अ‍ॅण्ड वॉच एवढेच त्यांनी वाक्य वापरले आहे. बाकी माहिती पवार यांनीच पत्रकार परिषदेत दिली.
माढा मतदारसंघात 2019 पहिल्यांदा भाजपाला यश मिळवून देण्यात मोहिते पाटील यांचा मोलाचा वाटा होता. मात्र अवघ्या पाच वर्षात पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात त्यांना यावे लागले आहे. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मतदारसंघात वाढता हस्तक्षेप मोहिते पाटील यांना मान्य नव्हता. तसेच त्यांच्या माळशिरस तालुक्यातही निंबाळकर व आमदार सातपुते यांनी आपली समर्थक वाढविण्यास सुरूवात केली होती. हे पाहता ज्यांना लोकसभा व विधानसभेला मदत केली त्यांनीच आपली राजकीय घडी बिघडवण्यास सुरूवात केल्याने व पक्षानेही त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्याने नाराज मोहिते पाटील यांनी वेगळी वाट तयार करण्याचा निर्णय घेतला व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत ते आता प्रवेश करणार आहेत. 

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close