राजकिय

आमदार राजू खरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

पंढरपूर – विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये काम करणारे उद्योगपती व मोहोळचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजू खरे यांनी विधान भवनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहकुटुंब भेट घेतली.
आमदार खरे हे सुरुवातीपासूनच शिवसेनेमध्ये काम करत होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या बरोबर राहिले. खरे हे मूळचे पंढरपूरचे असून ते शहरापासून जवळ असलेल्या मोहोळ मतदारसंघाला जोडलेल्या गोपाळपूचे रहिवाशी आहेत. त्यांनी मागील काही वर्षापासून मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. 2019 ला सुद्धा त्यांनी उमेदवारीसाठी खूप प्रयत्न केला होता. यानंतर मागील पाच वर्षात मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मोहोळ, उत्तर सोलापूर व पंढरपूर तालुक्यातील गावांमध्ये त्यांनी मोठे काम उभारले. स्वखर्चाने अनेक ठिकाणी रस्ते ,पाण्याच्या सोयी तसेच शाळांना मदत केली होती. विविध उपक्रम या कालावधीत त्यांनी राबवले. अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमदार खरे यांनी शासनाच्या विविध योजना मोहोळ विधानसभा मतदारसंघात आणल्याव यातून अनेक विकासकामे त्यांनी केली होती. त्यामुळे सहाजिकच त्यांचा जनसंपर्क वाढला होता.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीमध्ये हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेला. या पक्षाचे आमदार तेथे असल्यामुळे सहाजिकच यशवंत माने यांना पुन्हा तिथून उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर राजू खरे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला व यात त्यांना यश आले. मोहोळ मतदारसंघामध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटले व त्यांनी आमदार राजू खरे यांची साथ केली व खरे यांचा 30 हजाराहून अधिक मतांनी विजय झाला‌.
आमदार खरे व एकनाथ शिंदे यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. तसेच शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक मंत्री, आमदार हे खरे यांचे मित्र आहेत. राज्यात जरी महायुतीची सत्ता असली तरी आमदार खरे यांची मोहोळ मतदारसंघातील कामे मार्गी लागणार हे निश्चित आहे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close