सेंद्रिय शेती आणि गूळ उत्पादनात उमटवला ठसा, वरवडे येथील शेतकरी राजाराम गुरव यांचा यशस्वी प्रयोग

,,,,माढा, दि- अद्यापही शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे म्हणावा असा कल वाढताना दिसत नाही. अशा परिस्थितीत सेंद्रिय शेतीतून अधिक उत्पादन घेता येतं याचे उदाहरण वरवडे (ता.माढा) येथील शेतकरी राजाराम गुरव यांनी घालून दिले आहे. सेंद्रिय शेतीबरोबरच सेंद्रिय गूळ उत्पादनात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे.
वरवडे येथील राजाराम गुरव यांना वडिलोपार्जित सतरा एकर जमीन आहे. मागील पाच वर्षांपर्यंत ते रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून शेती कसत असत. या दरम्यान सेंद्रिय शेती गटातील काही शेतकऱ्यांच्या संपर्कात ते आले. जमिनीचा बिघडत चाललेला पोत सुधारण्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा संकल्प केला. दारात दोन खिलार, एक गीर व म्हशी अशी जनावर होतीच. शेण, गोमूत्र, जीवामृत, दशपर्णी, ताक, बेसनपीठ या सहज उपलब्ध होणाऱ्या देशी घटकांच्या मात्रा पिकांना देऊ लागले. ऊस, डाळिंब या प्रमुख नगदी पिकासह कांदा, मका, दोडका आदी पिकेही सेंद्रिय घटकावर अधिक उत्पादन देऊ लागली.
मागील दोन वर्षांपूर्वी निमगाव (ता. माळशिरस) येथील कृषिभूषण जगन्नाथ मगर यांच्या आग्रहाने उसाचे गुऱ्हाळ त्यांनी उभारले. गुऱ्हाळावर आपल्याच शेतातील सेंद्रिय उसाच्या रसापासून गूळ उत्पादन सुरू केले. या प्रक्रियेतही कोणतेही रसायन न वापरता केवळ भेंडीचा रस व चुना वापरून ते गुळाचे उत्पादन घेत आहेत. रोज किमान दोन आधाणं काढून जवळपास साडेतीनशे किलो सेंद्रिय गूळ ते उत्पादित करीत आहेत. त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा सुरू केलेला प्रयोग पाहण्यासाठी सध्या त्यांच्याकडे दररोज शेतकरी येत आहेत ऊस लागवडीवेळी शेण, गूळ व बेसन यांच्या आंबवणाचा सडा रानभर घातला जातो. उसासोबत आंतरपीक म्हणून भुईमुगाची पेरणी केली जाते. भुईमूग निघाल्यानंतर उडीद पेरला जातो. उडिदाचे उत्पादन न घेता जमिनीत गाडाला जातो. गाडलेला उडीद उगविल्यानंतर पुन्हा एकदा मातीत मिसळविला जातो, असा तिहेरी बेवूड उसाला मिळाल्याने रासायनिक खतांची आवश्यकता भासत नाही. गुऱ्हाळासाठीच्या काहिलीमध्ये येणाऱ्या रसातही मळीचे प्रमाण कमी होते. केवळ भेंडीचा रस वापरून ही मळी दूर करता येते.
सेंद्रिय शेतीसाठी शासनस्तरावरून आग्रही भूमिका राहिली आहे. शासनाने विक्री व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित करायला हवी. आम्ही उत्पादित केलेला गूळ स्थानिक बाजारपेठेतच विकतो. सेंद्रिय दर लावून अनेक उत्पादने भरमसाठ भावात विकली जातात. वेळ व मनुष्यबळाच्या अभावी योग्य बाजारपेठेपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. याबाबत शासनाने पुढाकार घ्यायला हवा , असे मत महेश राजाराम गुरव यांनी व्यक्त केले.



