सदाशिवनगरच्या श्री शंकर कारखान्याची निवडणूक जाहीर , विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष
पंढरपूर – माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 25 फेब्रुवारी मतदान होणार असून 26 फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे.
यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ ते २९ जानेवारी यादरम्यान आहे. शंकर सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालक यांच्या जागे करता ही निवडणूक होत असून पंधरा संचालक हे उत्पादक मतदारसंघ प्रतिनिधी आहेत. माळशिरस, इस्लामपूर, नातेपुते, फोंडशिरस, बोरगाव या गटातून प्रत्येकी तीन संचालक निवडले जाणार आहेत, संस्था मतदारसंघातून एक, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रतिनिधी एक, महिला राखीव प्रतिनिधी दोन ,इतर मागासवर्ग प्रतिनिधी एक , भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग एक, अशा 21 जागांकरता निवडणूक होत आहे.
अर्ज दाखल करण्याची मुदत 22 ते 29 जानेवारी दरम्यान असून छाननी 30 जानेवारी 2024 ला होईल. तर वैध उमेदवारांची यादी 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 14 फेब्रुवारी 2024 ला दुपारी तीन वाजेपर्यंत असून 15 फेब्रुवारी रोजी उमेदवारांना निशाणी किंवा चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. मतदान 15 फेब्रुवारी असून 26 तारखेला निकाल घोषित केला जाणार आहे.
श्री शंकर सहकारी साखर कारखाना सध्या आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या ताब्यात असून त्यांनी मागील निवडणुकीत हा कारखाना ताब्यात घेतला आहेऋ विस्तीर्ण कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. यंदाही विरोधक आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या गटासमोर आव्हान उभे करणार हे निश्चित आहे. शंकर कारखाना सुस्थितीत यावा, यासाठी आमदार मोहिते पाटील यांनी मागील पाच वर्षात अनेक प्रयत्न केले असून केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत मिळवली आहे.