राजकिय

माढा मतदारसंघ : मोहिते पाटलांच्या तव्यावर निंबाळकरांच्या पोळ्या भाजून निघतायेत !


भाजपासाठी ताटात पडो या वाटीत..फायद्याचेच

प्रशांत आराध्ये

माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या जिव्हाळ्याचे असणारे व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अनेक वर्षे सतत पाठपुरावा केलेले प्रश्‍न आता भाजपाच्या काळात मार्गी लागत असल्याने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना याचा फायदा होत आहे. यामुळे सध्या माळशिरस भागात गंमतीने मोहिते पाटलांच्या तव्यावर निंबाळकरांच्या पोळ्या भाजून निघत असल्याची चर्चा सुरू असते. यामुळे भाजपाला मात्र नक्की फायदा होताना दिसत आहे.
विजयसिंह मोहिते पाटील हे राज्याच्या राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. आज जरी ते भाजपात असले तरी त्यांनी आयुष्यभर विकासात्मक दृष्टीकोन ठेवून सर्वच पक्षातील नेत्यांशी आपले संबंध मृदू ठेवले आहेत. अकलूजमध्ये विकासाच्या अनेक योजना आणून त्यांनी त्या राबविल्या आहेत. विकासकामांच्या बाबतीत मोहिते पाटील यांनी तडजोड केली नाही. त्यांनीच अनेक वर्षे पंढरपूर- फलटण रेल्वे मार्गाचा प्रश्‍न उचलला होता. सन 2002 मध्ये वाजेपयी सरकारच्या काळात रेल्वे राज्यमंत्री असणारे बंडारू दत्तात्रेय हे पंढरपूरला आले असता त्यांच्याकडे या मार्गाची मागणी तेंव्हा राष्ट्रवादी युवकचे नेतृत्व करणार्‍या आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आग्रहाने केली होती.
पंढरपूर- फलटण रेल्वे मार्गाच्या कामाने खरी गती घेतली ती विजयसिंह मोहिते पाटील हे 2014 ला खासदार झाल्यानंतर. मोदी लाटेत ही त्यांनी माढा लोकसभेची जागा आपल्या जनसंपर्काच्या जोरावर जिंकून घेतली. त्यांच्या कामाची पध्दत व त्यांनी जपलेले राजकीय संबंध यामुळे  तत्कालीन रेल्वेमंत्री असणारे सुरेश प्रभू यांची त्यांच्याशी मैत्री झाली आणि शंभर वर्षे  प्रतीक्षा असणार्‍या या रेल्वे मार्गाला हिरवा झेंडा दाखविला गेला. तेंव्हा यासाठी 1130 कोटी रूपयांची तरतूदही केली गेली होती. मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे व सरकार भाजपाचे होते मात्र या विकासकामांवर याचा अडसर निर्माण झाला नाही. अशाच वेळी नेतृत्वाचा कस लागतो. याच प्रश्‍नावर आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यसभेत ही आवाज उठविला होता.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकिट दिले व मोहिते पाटील यांनी त्यांचा प्रचार केला. त्या निवडणुकीत रेल्वे मार्ग, कृष्णा भीमा स्थिरीकरण, निरा देवघर धरणाचे पाणी मतदारसंघात आणणे यासारखेच विषय कळीचे होते. ज्यांचा यापूर्वी मोहिते पाटील यांनी सतत उचचले व पाठपुरावा केला आहे. आता यातील रेल्वेचा प्रश्‍न मार्गी लागला असून राज्यात सरकार बदलताच  शिंदे व फडणवीस सरकारने यासाठी 921 कोटी रूपये देण्याचे मान्य करत राज्य सरकार यात वाटा उचलत असल्याचे जाहीर केले तर केंद्रीय अर्थसंकल्पात 120 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी सहाजिकच खासदारकीच्या काळात निंबाळकर यांनीही सतत प्रयत्न केले आहेत. मात्र या योजनांना आणण्याचा पाया सहाजिकच मोहिते पाटील यांनी तयार करून ठेवला होता.
विजयसिंह मोहिते पाटील यांनी आखलेला महत्वकांक्षी कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प हा तांत्रिक बाबींमुळे रखडला असला तरी तो पूर्ण करण्याचा मानस देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. कृष्णा मराठवाड्याचे काम सुरू आहे. यासाठी निरा – भीमा जोडणार्‍या बोगद्याचे कामही सुरू आहे. नुकतेच केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत व खासदार निंबाळकर यांचा पंढरपूर दौरा झाला आहे. यात त्यांनी सविस्तरपणे याबाबत माहिती दिली. निरा देवघर धरणाचे कालव्यांचे काम पूर्ण करून फलटण, माळशिरस, खंडाळा यासह पंढरपूर, सांगोला भागाला पाणी देण्यास राज्य सरकार अनुकूल यांनी सुधारित मान्यता ही देण्यात आली आहे. यासाठी कित्येक वर्षे मोहिते पाटील पिता-पुत्र पाठपुरावा करत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून सतत या योजनेची मागणी केली जात होती. आता फडणवीस यांनी यास मान्यता दिली आहे. याच बरोबर निरा उजवा कालव्याचे पाणी कमी पडत असल्याने समांतर पाइपलाइन टाकून शेतीला पाणी देण्याची मागणी आ. रणजितसिंह मोहिते पाटील हे करत आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाने अनेक राष्ट्रीय महामार्ग बांधले आहेत तसेच मुंबई- हैद्राबाद बुलेट ट्रेनचे ही सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. या मतदारसंघातील कामे राज्यात जून 2022 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर मार्गी लागत आहेत. यासाठी खा. निंबाळकर हे प्रयत्न करत असून मोहिते पाटील यांचे योगदानही दिसत आहे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close