भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर


पंढरपूर – संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय पुरस्कार समितीने घेतला आहे.
संत श्री नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येत्या २४ जुलै २०२५ रोजी दुपारी ०२ वाजता हा पुरस्कार सोहळा श्री केशवराज मंदिर, संत नामदेव महाराज वाडा, पंढरपूर येथे संपन्न होणार आहे. वारकरी संप्रदायाचे सक्षमीकरण, कीर्तनकारांचा गौरव, दिंड्यांना शासनमान्यता, आणि वारी प्रबोधन सेवा रथ यांसारख्या हातून घडलेल्या सेवेबद्दल हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्यासारख्या पांडुरंग भक्तासाठी ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. काल संत नामदेव महाराजांच्या तीन पिढ्यांतील वंशजांनी माझ्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन मला या पुरस्कार सोहळ्यासाठी निमंत्रित केले. त्यांनी मला या पुरस्कारास पात्र समजले, हा मी माझा बहुमान समजतो. तसेच या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल यावेळी श्री संत नामदेव महाराज देवस्थानचे मनापासून आभार मानले. तसेच या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी विनम्रपणे मान्यता दिली.
यावेळी या संत श्रीनामदेव महाराजांचे १६ वे वंशज श्री.मुकुंदमहाराज नामदास, संत श्रीनामदेव महाराजांचे १७ वे वंशज श्री.एकनाथमहाराज नामदास, श्री.निवृत्तीमहाराज नामदास, श्री.मुरारीमहाराज नामदास, संत श्रीनामदेव महाराजांचे १८ वे वंशज भावार्थमहाराज नामदास, आदित्यमहाराज नामदास पद्मनाभमहाराज नामदास व नामदेवमहाराज फड परिवार सदस्य उपस्थित होते. श्री संत नामदेव महाराज फड परंपरा इतर सदस्य तसेच धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले उपस्थित होते.




