सोलापूर जि प. अध्यक्षपदी भाजपचे बार्शीचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूरचे इंद्रजीत पवार यांना संधी

पंढरपूर – सोलापूर जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच बहुमत मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाने अध्यक्षपदाची संधी सर्वप्रथम बार्शी तालुक्यातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य दीपक वैद्य यांना दिली आहे तर उपाध्यक्षपदासाठी उत्तर सोलापूरचे इंद्रजीत पवार यांची बिनविरोध निवड होणे निश्चित झाले आहे. ही पद सव्वा सव्वा वर्षाकरिता आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेवर यंदा पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून त्यांचे 38 जिल्हा परिषद सदस्य विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेत भाजपचे पूर्ण बहुमत आहे. या विजयाचे शिल्पकार पालकमंत्री जयकुमार गोरे हे पदाधिकारी निवडीपूर्वी सोलापूरला दाखल झाले व त्यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा करून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार निवडले आहेत. बार्शी तालुक्यात माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा भाजपने जिंकले आहेत त्यामुळे अध्यक्षपदाचा मान या तालुक्याला देण्यात आला आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध होणार होत आहे. सकाळी ११ वाजता जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या उपस्थितीत बालाजी नरोटे, नेताजी खंडागळे आणि विकास बुळा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला.
तत्पूर्वी बालाजी सरोवर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ३८ सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत दीपक वैद्य यांचे अध्यक्षपदासाठी आणि इंद्रजीत पवार यांचे उपाध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले आले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेत दाखल होऊन अर्ज दाखल केले.
जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, गटनेत्या रश्मी बागल, चेतनसिंह केदार, पृथ्वीराज माने, नेताजी खंडागळे यांच्या उपस्थितीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष देशमुख यांच्याकडे हे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले.ण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी २ वाजता होणाऱ्या विशेष सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.




