पंढरपूर अर्बन बॅंक निवडणूक : विरोधकांचे अर्ज बाद केले जातील अशी दिलीप धोत्रेंना शंका !
पंढरपूर – पंढरपूर अर्बन बॅंकेच्या निवडणुकीत आमच्या उमेदवारांवर सत्ताधारी गटाकडून दबाव टाकला जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० हजार रुपयांचा शेअर्स आणि १ लाखाची ठेव ठेवण्याचा नियम करण्यात आला आहे. आमच्या सर्वच उमेदवारांनी सर्व अटी पूर्ण करून अर्ज दाखल केले आहेत. मात्र आमचे उमेदवारी अर्ज बाद करण्याची शक्यता सत्ताधारी मंडळींकडून होत असल्याचा आरोप मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे.
पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक गटाने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले. याला तगडे आवाहन अर्बन बँक बचाव समविचारी पॅनलच्यावतीने देण्यात आले आहे.
समविचारी पॅनलच्या वतीने सर्व जागांवर उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासमोर समविचारी आघाडीचे तगडे आवाहन उभे आहे.
याबाबत मंगळवारी समविचारी पॅनलचे प्रमुख मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन एकदा समोर समोरची लढाई होऊन जाऊ द्या. रडीचा डाव खेळू नका. असे आव्हान पंढरपूर अर्बन बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाला दिले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले,अरुण कोळी, सुधीर धोत्रे, लखन चौगुले, संजय बंदपट्टे, शशिकांत पाटील यांच्यासह समविचारी पॅनलचे उमेदवार उपस्थित होते. यावेळी बोलताना दिलीपबापू धोत्रे यांनी, निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप करत बँकेचा गैरपकारभार बाहेर येऊ नये यासाठी निवडणूक टाळण्याचा प्रयत्न सत्ताधारी मंडळींकडून केला जात आहे, असा आरोप केला.
बँक वाचवण्यासाठी आम्ही पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असल्याने बँकेच्या कारभारावर नाराज असलेले सभासद सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देतील आणि आमचा विजय करतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.