गतवर्षीच्या तुलनेत यंदा उजनीत 19 टक्के जास्त पाणीसाठा
पंढरपूर – उजनी धरणातून सध्या उन्हाळा हंगामाचे आवर्तन सुरू असून धरण उपयुक्त पातळीत 52.58 टक्के अशा स्थितीत आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणात 33 टक्के उपयुक्त पाणी शिल्लक होते. यंदा 19 टक्के जास्त जलसाठा आहे.
सोलापूर जिल्ह्यासह जलाशय काठासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा हा लागोपाठ सुरू असणाऱ्या सिंचनाच्या आवर्तनामुळे झपाट्याने कमी झाला आहे. रब्बीचे आवर्तन संपल्यानंतर आता पुन्हा उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. धरण 2025 च्या पावसाळा हंगामात शंभर टक्के भरले होते. यामुळे रब्बी व उन्हाळा हंगामात शेतीसाठी मुबलक पाणी देता येणे शक्य होत आहे.
मागील वर्षीही धरण क्षमतेने भरले होते. मात्र मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जलाशयात उपयुक्त पातळीत 33 टक्के पाणीसाठा हा शिल्लक होता. यंदा मात्र 19 टक्के जास्त पाणी जलाशयात शिल्लक आहे. सध्या धरणात एकूण पाणीसाठा हा 91.83 टीएमसी असून यातील उपयपुक्त पाणी हे 28.17 टीएमसी इतके आहे. उजनीतून मुख्य कालव्यात 2300 तर सीना माढा योजनेसाठी 315, दहिगाव योजनेसाठी 100 तर भीमा सीना जोडकालव्यात 900 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
निरा खोऱ्यातील धरणांची स्थिती
निरा खोऱ्यातही यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे. धरणांची यंदाची व कंसात गतवर्षीची स्थिती. निरा देवघर धरण – 61.76 टक्के (18.77), भाटघर -59 (51.60), गुंजवणी 53.82 (54.67) तर वीर धरण 50.96 (49.76 टक्के).
विभागवार पाणीसाठा
राज्यातील सहा विभागांमधील मोठ्या धरणांमध्ये 24 मार्च रोजी 56.68 टक्के सरासरी पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षी यात विभागात 50 टक्के जलसाठा होता. विभागनिहाय उपलब्ध पाणीसाठा- नागपूर -57.88 टक्के, अमरावती 58.90, छत्रपती संभाजीनगर 65.03, नाशिक 57.90 , पुणे 53.28, कोकण 53.06 टक्के
