Uncategorizedराजकिय

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत आ.आवताडे यांची भूमिका ठरणार महत्त्वाची, समर्थक आक्रमक

नगरपरिषद निवडणुकीचे वारे आता जोराने वाहू लागले असून पंढरपूरमध्ये आमदार समाधान आवताडे समर्थकही या निवडणुकीची तयारी करू लागले आहेत. विधानसभा मतदारसंघात परिचारक गटाबरोबर काम करणाऱ्या आमदार आवताडे यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार असून त्यांना माजी आमदार प्रशांत परिचारक आपल्या आघाडीत सामावून घेणार ? की भाजपच्या चिन्हावरच हे दोन्ही नेते निवडणूक लढवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज्यामध्ये सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चिन्हावर लढवण्याचा संकल्प केला असून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी हे महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र सोलापूर जिल्ह्याचे राजकारण पाहता अनेक ठिकाणी आघाड्यांचे प्राबल्य आहे. येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पक्षांपेक्षा या आघाड्या प्रभावी ठरतात हा अनुभव आहे. पंढरपूर नगरपरिषदेत सुद्धा परिचारक यांची पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडी कार्यरत असते. ते या आघाडी अंतर्गत काही जागा भाजपच्या कमळ चिन्हावर लढवतात. आता पंढरपूर मतदारसंघाचे राजकारण बदलत चालले असून सलग दुसऱ्यांदा भाजपचे समाधान आवताडे हे आमदार झाले आहेत. यामुळे सहाजिकच त्यांचे समर्थक पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी आक्रमक आहेत.
परिचारक गटाने आवताडे समर्थकांना सन्मानाची वागणूक देऊन योग्य जागा सोडाव्यात, अशी मागणी ते करत आहेत. या संदर्भात नुकतीच पंढरपूर विश्रामगहात आमदार आवताडे समर्थकांची बैठकही पार पडली यास अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या निवडणुका नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता असून याची तयारी आता पंढरपूरमध्ये विरोधकही करू लागले आहेत. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, मनसे नेते दिलीप धोत्रे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्यासह भगीरथ भालके व अन्य नेतेही कामाला लागले आहेत. माजी आमदार प्रशांत परिचारक यांची पंढरपूर नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता होती. सध्या प्रशासक राज्य सुरू आहे. येणाऱ्या निवडणुकीत परिचारक गटाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. सध्याचे राजकारण पाहता पंढरपूर शहरात आमदार समाधान आवताडे यांचे समर्थक ही वाढले आहेत. हे पाहता परिचारकांना आवताडे गटाला या निवडणुकीत बरोबर घेणे आवश्यक आहे, हे जाणूनच आता आमदार अवताडे समर्थक बैठका घेऊन आपली ताकद दाखवू लागले आहेत.
2021 च्या पोटनिवडणुकीपासून परिचारक व आवताडे गट एकत्र काम करत आहेत. मात्र त्यांच्यातील छुपा राजकीय संघर्ष हा सतत उफाळून येतो. परिचारक गटाने मंगळवेढा भागामध्ये आवताडे विरोधकांना साथ देऊन आपले स्वतंत्र अस्तित्व त्या भागात निर्माण केले आहे . मात्र परिचारक हे विधानसभा निवडणुकीला समाधान आवताडे यांच्या पाठीशी आपली ताकद लावतात, हेही तितकेच खरे आहे. आता आवताडे समर्थकांना पंढरपूर भागामध्ये ही आपली ताकद वाढवण्याची गरज भासू लागली आहे. यामुळेच त्यांनी सन्मानाने आघाडी करून अथवा आमदार आवताडे यांना विश्वासात घेऊन येणाऱ्या निवडणुका लढवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान भारतीय जनता पक्ष पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक कमळ चिन्हावर लढवण्यासाठी आग्रही असणार हे निश्चित आहे. नगराध्यक्ष जनतेतून निवडले जाणार असल्याने येथे पक्षाचे चिन्ह रुजवणे यामुळे सोपे जाणार आहे. यातच हा मतदारसंघ सलग दोन वेळा भाजपने जिंकल्यामुळे येथे पक्षाची ताकद दिसून आली आहे, हे पाहता वरिष्ठ पातळीवरून आवताडे व परिचारक यांना एकत्रितपणे पक्षाच्या चिन्हावरच नगरपरिषद लढवण्याबाबत निर्देश मिळू शकतात. हे पाहता आमदार आवताडे समर्थक आता आपली तयारी करू लागले आहेत.
प्रशांत परिचारक यांनी अद्याप नगरपरिषद निवडणुकीबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. या गटाकडे शहरात अनेक प्रस्थापित नेते असल्यामुळे ते ऐनवेळी आपले निर्णय घेतात. गेल्या काही दिवसांपासून प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे हे एकत्र दिसत आहेत. यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात विरोधकांची तयारी पाहता हे दोन्ही गट एकत्रित येऊन पंढरपूर व मंगळवेढा भागामध्ये आपली ताकद अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित आहे. पंढरपूर नगरपरिषदेप्रमाणे मंगळवेढा शहरात तसेच जिल्हा परिषद , पंचायत समिती व यानंतर होणाऱ्या येणाऱ्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक यांची भूमिका काय असणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close