मोहिते पाटील यांचा नवा राजकीय डाव, बाळदादा म्हणाले, आता आम्ही आ. रणजितदादांबरोबर !

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका
आम्ही आमदार रणजितदादांसोबत : बाळदादा
माळशिरस तालुक्यात भाजपचे काम करण्याचे सुतोवाच
अकलूज – लोकसभा निवडणुकीत आम्ही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत होतो. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आम्ही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सोबत असल्याचे सहकारमहर्षी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी 64 व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी सांगितले.
माळशिरस तालुक्यात होणाऱ्या सर्व निवडणुकांची व्यूहरचना जयसिंह मोहिते पाटील हे करतात. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या खासदारकीच्या निवडणुकीत भाजपा विधानपरिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील अलिप्त राहिले होते. परिवारातील बहुतांश सदस्य धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करत होते. दिवाळी नंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मोहिते पाटील भाजपाकडून लढवणार की राष्ट्रवादीकडून ? याची सगळ्या माळशिरस तालुक्याला उत्सुकता लागली होती. आज जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही रणजितदादांबरोबर असल्याचे सांगून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात जि. प. व पं. स. वरती भाजपाचाच झेंडा फडकणार हे आता स्पष्ट होत आहे.
नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्रीपूर येथील पांडुरंग साखर कारखान्यात कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी व्यासपीठावरील विजयसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याशी त्यांची यांची बराच वेळ चर्चा चालली होती. त्यामुळे मुख्यमंत्री मोहिते पाटलांवर नाराज असल्याच्या चर्चाना पूर्णविराम मिळाला होता.
धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून खासदार आहेत. मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार राम सातपुते आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे दोघेही भाजपामध्य काम करत आहेत. सातपुतेंच्या नेतृत्वाखाली भाजपाची एक फळी येत्या निवडणुकांसाठी आक्रमक झाली आहे. मोहिते पाटील राष्ट्रवादीकडून निवडणुका लढवतील अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु आम्ही रणजितदादांबरोबर आहे, असे म्हणत जयसिंह मोहिते पाटील यांनी खूप मोठा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. यामुळे मोहिते पाटील यांना विरोध करायला सरसावलेले सातपुते कमालीचे निराश होतील, असे दिसत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजपाचे उमेदवार निवडून आणून आपली ताकद दाखवून देण्याची सातपुते यांची खेळी होती. पण आता मोहिते पाटीलही भाजपा सोबतच असल्याने सातपुतेंची अडचण होणार आहे. आता फक्त माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात उमेदवार निवड, ए. बी. फॉर्म व प्रचार यंत्रणा याची जबाबदारी कोणावर दिली जातेय ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सोलापूर शहरासह जिल्ह्यातील बरीच दिग्गज मंडळी सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. त्यातच मोहिते पाटील पूर्ण क्षमतेने भाजपासोबत राहिले तर सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे कमळ फुल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित.




