राजकिय

पंढरपूर राष्ट्रवादीतील गटबाजीवर “पक्षनियुक्त समिती” शोधणार उतारा , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऐकून घेतली गार्‍हाणी

पंढरपूर –    येथे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातील कुरबुरी कमी करण्यासाठी पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी  गटातटातील पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी अनेकांनी आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या. दरम्यान याबाबत लवकरच एक समिती तयार करून त्यांच्यासमोर याविषयीचा निर्णय घेण्याचा तोडगा त्यांनी काढला. हा निर्णय बंद दाराआड झालेल्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. आता एक तालुका पातळीवरील पक्षाअंतर्गत गटबाजीसाठी समितीचा पर्याय राष्ट्रवादीने स्वीकारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
पंढरपूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून तो पक्षस्थापनेपासून शरद पवार यांना मानणारा आहे. पण येथे गटबाजी ही खूप मोठ्या प्रमाणात असून ती पूर्वीही होती आणि आताही आहेच. येथील आमदार कै. भारत भालके यांच्या निधनानंतर पक्षात पुन्हा कुरबुरी सुरू झाल्या असून त्या अखेर आज जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर सर्वांनीच मांडल्या. पक्षातील सर्व पदाधिकार्‍यांचे म्हणणे पाटील यांनी शांतपणे ऐकून यावर एक समिती नियुक्त करण्याची सूचना केली असून सदर समितीचा निर्णय अंतिम राहणार असल्याचा निर्णय बैठकी मध्ये घेण्यात आला.
या बैठकीत आलेल्या काहींनी जयंत पाटील यांच्यासमोर आपल्या भावना मोकळ्या करताना स्पष्ट केले की येथील वाद जर मिटला नाही तर काही काहीजण भाजपात जातील. यानंतर पाटील यांनी सर्वांचे म्हणणे अत्यंत शांतपणे ऐकून घेतले तसेच त्यांना काही सूचना देखील केल्या. मात्र हे सारे बंद खोलीत घडले. येथे आलेल्या पदाधिकार्‍यांनी तसेच असंतुष्टांनी आपले म्हणणे तसेच तक्रारी पाटील यांच्या कानावर घातल्या व यावर तोडगा शोधण्याची विनंती केली. आता लवकरच याबाबत निर्णय अपेक्षित असल्याचे पाटील यांनी सांगितले व यासाठी एक समिती नेमून ती यातून मार्ग शोधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष जरी पंढरीत आले तरी त्यांना अंतिम तोडगा काढणे शक्य झाले नसल्याचे यामुळे दिसत होते. आता समितीवर सारी भिस्त आहे. या समितीत कोण कोण असणार हे पाहणे ही औत्सुक्याचे ठरणार आहे.
पंढरपूर तालुक्यातील मातब्बर भालके व काळे गट दोन्हीही राष्ट्रवादीत आहेत तर जुने पदाधिकारी ही येथे काम करत आहेत. अशा स्थितीत ही पक्षातील येथील कुरबुरी हा डोकेदुखीचा विषय बनल्याने  यावर तोडगा शोधण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सांगण्यात आले होते पण त्यांना ही यात यश न आल्याने अखेर जयंत पाटील यांनीच आज पंढरीत हजेरी लावली. त्यांनी त तालुक्यातील आढीव येथे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या वसंतबागेत बैठक घेतली.  यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार दीपक साळुंखे, जि.प.सदस्य उमेश पाटील, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके, संचालक युवराज पाटील, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, श्रीकांत शिंदे, सुधीर भोसले, संदीप मांडवे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नियोजीत दौर्‍यानुसार पाटील हे सुरूवातीला काळे यांच्या फार्महाऊसवर जाणार होते व नंतर विश्रामगृहात बैठकीचे नियोजन होते मात्र त्यांनी काळे यांच्या आढीवच्या वसंतबागेतच बैठक बोलाविली व चर्चा केली.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close