सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक जाहीर, काळेंसमोर आव्हानं उभे करण्यासाठी विरोधक एकवटणार
पंढरपूर दि. 11 – संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. 21 संचालक निवडीसाठी 16 जून मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.
या निवडणूकीसाठी पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयातील सभागृहात 12 ते 18 मे याकालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची यादी त्या त्या दिवशी प्रसिध्द करण्यात येणार आहे. अर्जांची छाननी 19 मे रोजी होईल. ग्राह्य अर्जांची यादी 22 मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात व संस्थेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येणार आहे. 5 जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून सहा जून रोजी चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. मतदान 16 जून रोजी होणार असून 18 रोजी शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे मतमोजणी होईल.
या कारखान्याची दहा हजार आठशे त्र्याऐंशी सभासदांची अंतिम मतदार यादी 25 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाली आहे. आता निवडणूक प्रक्रिया सुरू होत असून येथे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांना आव्हान देण्यासाठी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील तसेच काळे यांचे कट्टर विरोधक दीपक पवार यांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत काळे यांना टक्कर देण्याकरता अभिजीत पाटील व दीपक पवार एकत्र येण्याची शक्यता आहे. मध्यंतरी शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास पाटील यांनी दीपक पवार यांना निमंत्रण देऊन नवीन आघाडीचे सूतोवाच केले होते.
सहकार शिरोमणी कारखान्यावर कल्याणराव काळे यांचे सुरुवातीपासून वर्चस्व असून मागील 23 वर्ष ते चेअरमन आहेत. अलीकडच्या काळात या कारखान्यात त्यांना विरोध करण्यासाठी काही सभासद पुढे येत आहेत. मागील निवडणुकीत डॉ. बी.पी. रोंगे तसेच दीपक पवार यांनी स्वतंत्र पॅनल उभी केली होती. यामुळे मत विभागणी होऊन काळे यांना फायदा झाला होता मात्र यंदा अभिजीत पाटील यांनी डॉ. रोंगे , दीपक पवार यांना बरोबर घेत काळे यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचे ठरविले आहे. पाटील हे राष्ट्रवादी पक्षात आल्यामुळे ते सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक लढवणार नाहीत असा अंदाज काळे समर्थकांचा होता. मात्र पाटील यांनी आपली भूमिका बदललेली नाही, असे दिसत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटच पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकतील असे चित्र आहे.