अजितदादांबाबतच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा शरद पवार व सुप्रियाताईंचा प्रयत्न !
सासवड – राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते अजित पवार हे येत्या काही दिवसात भारतीय जनता पक्षासोबत जाणार अशा चर्चा रंगत असून गेल्या दोन दिवसापासून त्यांनी आपले नियोजित दौरे रद्द करून पक्षातील आमदारांच्या सह्या घेण्याचे काम सुरू केले असल्याचे वृत्त असून याबाबत पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना विचारले असता त्यांनी अजित पवारांबद्दल जे काही सध्या चर्चिले जात आहे. ते तुमच्या मनातील आहे ,आमच्या अथवा अजितदादांच्या मनात असे काहीही नाही ,असे सांगत या सर्व वावड्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुणे जिल्ह्यातील सासवड येथे एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले ,सध्या पक्षाचे राज्याध्यक्ष जयंत पाटील तसेच अजितदादा व आम्ही सर्वजण पक्षाचे जोमाने काम करत असून अजित पवार हे मुंबईत असून ते पक्षासाठीच कार्य करत आहेत. यामुळे ते भाजपा बरोबर सरकार स्थापन करणार हे सर्व कलोकल्पित आहे, यात कोणतेही तथ्य नाही. दरम्यान यावेळी पवार यांना अजितदादांच्या हालचाली व सध्या त्यांची भाजपा बरोबर वाढलेली जवळीक याबाबत विचारले असता त्यांनी, मी काय सांगतो ते महत्त्वाचे आहे आणि तेच बरोबर आहे असे सांगत पत्रकारांचे याबाबतचे प्रश्न थांबवले. यावेळी त्यांनी देशात भाजप विरोधात विरोधकांची मोट बांधणे तसेच राज्यात महाविकास आघाडी भक्कम करणे यावर भाष्य केले.
दरम्यान राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या भाजप जवळची विषयी विचारले असता त्यांनी, यावर आश्चर्य व्यक्त केले तसेच पक्षाचे जे नेते अथवा आमदार यांनी याबाबत काही भाष्य केले असेल,तर त्याचे फुटेज (vdo) मला द्या यानंतरच माझी प्रतिक्रिया देते अशी भूमिका मांडली.