राजकिय

जलनायक है हम…

शिंदे व फडणवीस सरकार सत्तेत आल्याने सांगोला सारख्या दुष्काळी पट्ट्यातील सिंचन योजनांना मंजुर्‍या आणून याचा मोठ्या प्रमाणात गवगवा करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचे भाजपाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला तालुक्यातील गावभेट दौर्‍यात स्पष्ट जाणवत होते. खासदार व आमदार या दोघांनाही जलनायक बनविण्याचा प्रयत्न होताना दिसत होता. वास्तविक पाहता योजना कागदावर तयार झाल्यानंतर ही प्रत्यक्षात साकारण्यास किती कालावधी लागतो हे माढा लोकसभा मतदारसंघातील जनता जाणून आहे.
लोकसभा निवडणुका या एक वर्षावर आल्या असून पुन्हा माढ्यातून उमेदवारीसाठी भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रयत्नशील आहेत. या मतदारसंघात त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून यंदा भाजपातून अनेकजण येथून उमेदवारीसाठी प्रयत्न करणार हे निश्‍चित आहे. हे पाहता निंबाळकर आता कामाला लागले आहेत. सध्या त्यांनी या मतदारसंघातील सिंचन योजनांवर भर दिला आहे. कोट्यवधी रूपयांच्या कामाला मंजुर्‍या आणल्या जात आहेत. याबाबत पत्रकार परिषदा घेवून माहिती दिल्यानंतर  निंबाळकर यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना बरोबर घेवून खासदार व आमदार आपल्या दारी हा उपक्रम सांगोला तालुक्यात राबविला आहे.
शहाजीबापू पाटील हे आपल्या वर्क्तृत्व शैलीसाठी प्रसिध्द असून ते गावागावी जावून खा. निंबाळकर यांच्या कामाचे कौतुक करताना या मतदारसंघाचे यापूर्वी प्रतिनिधित्व केलेल्या शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगोला तालुक्यासाठी काय काम केले असा सवाल करताना दिसतात. शिंदे व फडणवीस सरकार आल्यापासून दोन हजार कोटी रूपयांचा निधी आणल्याचा त्यांचा दावा आहे. टेंभू – म्हैसाळचे पाणी असो की सांगोला उपसा सिंचन योजना यासह निरा देवघरचे सांगोला व पंढरपूरला मंजूर झाल्याचे पाणी यावर त्यांचा जोर भाषणात दिसला. तर खा. निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांसाठी सिंचन योजना आणल्याचा दावा करत आहेत. पाण्याचे सारे प्रश्‍न सुटत असून येणारी 2024 ची  लोकसभा निवडणूक ही पाण्याच्या प्रश्‍नावर होणार नाही, असा त्यांचा दावा आहे.
दरम्यान आमदार पाटील व खासदार निंबाळकर यांचा उल्लेख त्यांचे समर्थक जलनायक म्हणून करताना दिसत आहे. पाण्यासारख्या संवेदनाशील विषयावर या दोन्ही नेत्यांनी भर दिला आहे. ज्या सांगोला तालुक्यात त्यांचे गावभेट दौरे झाले तेथील जनतेने शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्व. गणपतआबा देशमुख यांनी या दुष्काळी पट्ट्यात पाणी योजना आणताना किती परिश्रम घेतले आहेत, हे पाहिले आहे. या भागात सिंचनाच्या पाण्याचे प्रश्‍न असून याच भोवती येथील निवडणुकांचे राजकारण ही फिरत असते. यामुळे येत्या काळातही हाच विषय कळीचा आहे. केवळ योजना मंजूर होवून चालत नाहीत तर यासाठी मोठा निधी लागतो व याचे काम पूर्ण होण्यास अनेक वर्षे वाट पाहावी लागते, हे जनता जाणून आहे.
सरकार बदलली की योजनांनाही याचा फटका बसतो हे शेजारच्या मंगळवेढा तालुक्याच्या उपसा सिंचन योजनेवरून दिसून येते. 2014 ला खास बाब म्हणून मंजूर झालेली योजना आज 9 वर्षे झाली रेंगाळली आहे. यात काही बदल करण्यात आले असून आता मंत्रिमंडळ मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे माढा मतदारसंघात सिंचन योजना मंजूर झाल्या याचे काम सुरू करून ते पूर्ण घेणे गरजेचे असते. येत्या काही दिवसात येथील महत्वकांक्षी योजनांची भूमिपूजन होवून काम लवकरात लवकर सुरू होतील व या दुष्काळी पट्ट्यातील गावे हिरवीगार होतील, अशी ग्वाही या गावभेट दौर्‍यात हे नेते देताना दिसत होते. आता शेतकर्‍यांना जलनायकांकडून मिळालेली आश्‍वासनं कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा असणार हे निश्‍चित.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close