राज्य

विठ्ठल व भीमा कारखान्याबाबत आज मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक, तोडगा निघण्याची शक्यता

मागील वर्षी कै. आमदार भारत भालके यांनी विठ्ठल, भीमा व सहकार शिरोमणी हे तीनही कारखाने सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने त्यांना तातडीने थकहमी मिळाली होती व एकाच वेळी हे सर्व कारखाने सुरू झाले होते. मात्र यंदा सहकार शिरोमणी कारखान्याने बाजी मारली असून त्यांच्या कर्जाला थकहमी लवकर मिळाली आहे. आता भीमा व विठ्ठल बाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. 

मुंंबई- पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल व मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज गुरूवारी मुंबईत बैठक बोलाविली असून यास सहकार विभागासह राज्य बँकेचे अधिकारी ही उपस्थित राहणार आहेत. कालच सहकार शिरोमणी कारखान्याला सरकारने थकहमी दिली असून या दोन कारखान्यांचा प्रश्‍न अद्याप प्रलंबित आहे.
दोन दिवसापूर्वी विठ्ठल व भीमा परिवारातील नेत्यांनी पवार यांची पुण्यात भेट घेवून त्यांना कारखानदारीबाबत माहिती दिली होती. यानंतर बुधवारी मंत्रिमंडळाने राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी कारखान्याच्या कर्जाला अठरा कोटी रूपयांची थकहमी दिली असल्याने या कारखान्याचा प्रश्‍न मिटला आहे. नवा हंगाम हा कारखाना आता घेवू शकतो व  त्यांची तयारीही पूर्ण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी मोलाची साथ केली आहे.
दरम्यान विठ्ठल कारखाना सुरू करण्यासाठी ही शासनाच्या थकहमीची गरज आहे. सभासदांची ऊसबिले हा कारखानाही देणे आहे. शरद पवार यांनी यासाठीच राज्य सरकारचा सहकार विभाग, राज्य सहकारी बँक यांच्या अधिकार्‍यांसमवेत या दोन्ही कारखान्यांच्या अध्यक्षांना घेवून गुरूवारी बैठक बोलाविली आहे. दुपारी ती पार पडेल असे समजते. यासाठी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके व भीमाचे धनंजय महाडिक हे मुंबईत गेले आहेत.
विठ्ठल व भीमा कारखान्याच्या थकीत बिलांवरून या भागात रणकंदन माजले असून सतत आंदोलन होत आहेत. राज्य सरकार कारखान्यांना थकहमी देताना खूप विचार करत असल्याचे दिसत आहे. बुधवारी राज्यातील केवळ दोनच कारखान्यांना या टप्प्यात थकहमी दिल्याचे दिसत आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या या कारखान्यांना यातून बाहेर काढण्यासाठी शरद पवार यांनी पुन्हा पुढाकार घेतला आहे.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close