Uncategorized

सोलापूर जिल्ह्यात होणार ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित, काॅल करताच आपत्तीच्या काळात मिळणार तत्काळ मदत

पंढरपूर – गेल्या 9 वर्षांत पुणे, नाशिक, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील साडेतीन हजाराहून अधिक गावे  व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून सदरची यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते. यात आता सोलापूर जिल्हा ही जोडला जात असून माढा येथे याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक  तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून , जिल्हा परिषद सोलापूर व जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी माढा पोलीस स्टेशन हद्दीतील 39 गावांमधील सर्व पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार व  सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे 18002703600 प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री. डी. के. गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले. सर्व सरपंच व नागरिकांनी या यंत्रणेत पुढील 48 तासांत सहभागी होण्याचे आश्‍वासन दिले. सदर कार्यक्रमास तहसीलदार श्री. राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी श्री. संताजी पाटील तसेच नगर पंचायतचे सर्व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. संयोजन व सूत्रसंचालन उपविभागीय अधिकारी श्री.अभिजित धाराशिवकर  यांच्या मार्गदर्शनात   सहायक पोलीस निरीक्षक  श्री. शाम बुवा  यांनी केले.  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, महम्मद शेख तसेच सर्व बीट अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close