विठ्ठल कारखान्याचे शरद पवार होणार “तारणहार”?, लवकरच बैठक घेवून तोडगा काढण्याचे सूतोवाच, हंगाम कधी सुरू होणार.. याकडे सभासदांचे लक्ष

पंढरपूर – तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होणार की नाही? याबाबत चर्चा रंगत असतानाच या प्रकरणी लवकरच राज्य सहकारी बँक तसेच राज्य सरकारचे सहकार मंत्रालय व कारखान्याचे पदाधिकारी यांची बैठक घेवून यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचित केल्याने आता सार्यांचे लक्ष याकडे लागले आहे. यंदाच्या हंगामात शेतकर्यांची बिलं देवून हा कारखाना थोडा उशिरा का होईना पण सुरू होईल अशी आशा सर्वांना लागली आहे.
महाविकास आघाडी सरकारचे प्रवर्तक शरद पवार यांची विठ्ठल कारखान्याचे संचालक तसेच परिवारातील नेते कल्याणराव काळे यांच्यासह भीमा परिवाराचे नेते धनंजय महाडिक यांनी मंगळवारी पुण्यात भेट घेतली व त्यांच्यासमोर साखर कारखानदारीतील प्रश्न मांडले. यावेळी विठ्ठल कारखान्याचा विषय निघाला असता पवार यांनी लवकरच राज्य सहकारी बँक, सरकारचे प्रतिनिधी यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून यावर तोडगा शोधू असे आश्वासन दिले आहे. पवार यांनी आजवर विठ्ठल परिवाराला नेहमीच ताकद व साथ दिली आहे. यामुळे या बिकट प्रसंगात ते मदतीला धावून येतील अशी अशा सभासद शेतकर्यांना आहे. कारखान्याकडे असणारी थकीत ऊसबिल यासह वाहतूकदारांचे पैसे तसेच कामगारांचे वेतन यावरून संचालक मंडळात वाद निर्माण झाला आहे. युवराज पाटील यांनी चेअरमन भगीरथ भालके यांचा राजीनामा मागितला आहे यासह संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीसही भालके अनुपस्थित राहिल्याने त्यांनी कारखान्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा अन्यथा राजीनामा द्यावा यावरच चर्चा रंगली होती.
यानंतर आता काही संचालक तसेच सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे व भीमाचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी पवार यांची पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्ट्टियूटमध्ये भेट घेतली. येथील कारखान्यांसमोर आर्थिक संकट असून भीमा व सहकार शिरोमणी कारखान्याचेही अनेक प्रश्न आहेत. नवीन हंगाम तोंडावर असल्याने राज्य शासनाकडून कर्जाला थकहमी हवी आहे. हे सारे प्रश्न शरद पवार हे जाणत असून त्यांनीच 2020 ला हंगाम सुरू करण्यापूर्वी या तीनही कारखान्यांना सहकार्य केले होते. त्यावेळी कै. आमदार भारत भालके यांनी कारखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता त्यांची उणीव सार्यांना भासत आहे.
सहकार शिरोमणी कारखाना सुरू करण्याची तयारी झाली असली तरी विठ्ठलमध्ये हालचाली दिसत नाहीत. यामुळे संचालक व सभासदांनामध्ये संभ्रम आहे. यातच गेले काही दिवस अध्यक्ष भगीरथ भालके यांनीही संपर्क कमी केला असल्याने नाराजीचा सूर संचालक मंडळात उमटत आहे. विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कारखान्यास मदत करू असे जाहीर केेले होते. यामुळे आता सार्यांचे लक्ष शरद पवार यांच्या भूमिकेकडे आहे. राज्य सरकारच्या हाती बरेच निर्णय आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व शरद पवार हे विठ्ठल कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करतील अशी शक्यता सारे बोलून दाखवत आहेत.
