विक्रमी गर्दीच्या साक्षीने आषाढी एकादशीचा महासोहळा साजरा, यंदा गर्दी व्यवस्थापनासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर

पंढरपूर, दि. 6- लवकर व मुबलक झालेल्या पावसामुळे राज्यभरातून भाविकांनी आषाढीच्या महासोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून सुमारे अठरा ते वीस लाख भाविक एकादशी दिवशी येथे असावेत, असा अंदाज आहे. यंदाची वारी मोठ्या प्रमाणात भरण्याचा अंदाज असल्याने प्रशासनाने हायटेक तंत्रज्ञानाचा वापर येथे केला असून सुमारे 106 सीसीटीव्ही कॅमेरे व चौदा ड्रोन गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून आहेत.

पालखी सोहळ्यांसमवेत यंदा भाविकांची संख्या जास्त असल्याचे सुरूवातीपासून दिसतच होते. यामुळे वारीला पंढरीत मोठी गर्दी होणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार पोलीस दलानेही जोरदार तयारी केली होती. शनिवारी पालखी सोहळे पंढरीत आल्यानंतर येथे मोठी झाली होती तर एकादशीच्या सकाळपर्यंत भाविक पंढरीत येतच होते. पहाटे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. यानंतर भाविकांसाठी पदस्पर्श दर्शन सुरू झाले होते. दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेली होती. हजारो भाविक रांगेत उभे होते.
सकाळी आषाढीसाठी पंढरीत आलेल्या संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांनी नगरप्रदक्षिणा पूर्ण करून संतांच्या पादुकांना चंद्रभागा स्नान घातले. यावेळी पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी खासगीवाले यांचा रथ ही निघाला होता. विठ्ठल, रखुमाई व राही यांच्या मूर्ती असलेली ही रथयात्रा प्रदक्षिणा मार्गावरून निघाली होती. ज्या भाविकांना विठ्ठलाचे दर्शन मिळत नाही ते या रथाचे दर्शन घेतात. या रथयात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
एकादशीला पहाटेपासून चंद्रभागा वाळवंटात पवित्र स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तर विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची सर्वाधिक गर्दी दिसत होती. येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. टॉवरवरून गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात होता. राज्याचे मंत्री गिरीश महाजन गर्दी व्यवस्थापनासाठी प्रयत्न करत होते. प्रदक्षिणा मार्गावर दिंड्या व पालख्यांच्या प्रदक्षिणा सुरू असल्याने येथेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भक्तिसागर 65 एकरातून येताना भाविक चंद्रभागा नदीवरील जुन्या दगडी पुलाचा वापर करत असल्याने याला दोन्ही बाजूनी लोखंडी बॅरेगेटिंग करण्यात आले आहे.
पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे होती तर मुखदर्शन रांगेतही भाविकांनी गर्दी केली होती.
यंदा वारीला मोठी गर्दी झाल्याने शहराबरोबरच उपनगर, शहरानजीकच्या गावांमध्ये यात्रेकरू थांबल्याचे दिसत आहे. वाहनांची संख्याही खूप असल्याचे दिसत होती. एकादशी दिवशी पंढरी नगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली होती. सर्वत्र भजन, कीर्तन व प्रवचन सुरू होती.

