कॅरिडॉरमुळे कोणीही उद्ध्वस्त होणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस यांची पंढरपूरकरांना ग्वाही

प्रतिनिधी
पंढरपूर, दि. 6- पंढरपूरला राबविण्यात येणार्या कॅरिडॉरमुळे श्री विठ्ठल मंदिर परिसरातील कोणीही नागरिक, व्यापारी, व्यावसायिक हा उद्ध्वस्त होणार नाही. त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन केले जाईल,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आषाढी एकादशीच्या महापूजेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, जिल्हाधिकारी यांनी अनेक बैठका घेवून येथील नागरिकांशी चर्चा केली आहे. अनेक लोकांशी चर्चा करून शंका दूर केल्या आहेत. पुढे ही काही शंका असल्यास त्या दूर करूनच हा कॅरिडॉर तयार केला जाणार आहे. यात कोणाचेही नुकसान होवू दिले जाणार नाही. यासाठी सर्वांना विश्वासात घेतले जाईल तसेच त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतकर्यांच्या कर्जमाफी बाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मी विठ्ठलला शेतकर्यांचे कल्याण मागितले आहे. यामुळे ज्या ज्या गोष्टीत शेतकर्यांचे कल्याण असेल त्या सर्व गोष्टी माझ्या हातून व्हाव्यात, अशी आपण प्रार्थना केली आहे. दरम्यान आषाढी वारीत राबविण्यात आलेल्या विविध उपाय योजनांबाबत बोलताना ते म्हणाले, मागील काही वर्षांपासून यात्रेत नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. यंदा अत्यंत चांगल्या पध्दतीचे नियोजन झाले असून यात्रेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर हा यापुढील काळातही काळात केला जाईल.
सुब्रह्मणम स्वामी यांनी मंदिराच्या सरकारीकरणाला केलेल्या विरोधाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अशीच भूमिका ही विश्व हिंदू परिषदेचीही भूमिका राहिली आहे. शक्यतो मंदिराचे सरकारीकरण होवू नये आणि ते भक्तांच्या ताब्यात रहावे. मात्र ज्या ठिकाणी कारभार खूप मोठा होतो तेथे कायदा करावा लागतो. याचा अर्थ मंदिराचे सरकारीकरण झाले असे होत नाही. कायद्याच्या माध्यमातून व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न आहे. कायदा केल्यानंतर मंदिरात किती सुधारणा झाल्या आहेत हे आपण पाहिले आहे.

