सातपुतेंना ताकद देत भाजपची लोकसभेची तयारी

आता लोकसभा निवडणुकीची तयारी या पक्षाने सुरू केली आहे.2024 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप पासून फारकत घेतली. यानंतर येथील राजकारणात भाजप ला अनेक धक्के पचवावे लागले. माढा, सोलापूर या दोन्ही जागा लोकसभेला गमवाव्या लागल्या तर विधानसभेलाही म्हणावे तसे यश त्यांना मिळाले नाही. माळशिरसमध्ये राम सातपुते यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप क्रमांक एकच पक्ष ठरला आणि सोलापूरचे पालकमंत्रीपद जयकुमार गोरे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी या जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यास सुरूवात केली. लोकसभेला त्यांचे मित्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभव पत्करावा लागला होता. याचे शल्य त्यांच्या मनात आहे. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविताना राम सातपुते यांनी गोरे यांना मोलाची साथ दिली आहे.माळशिरस तालुक्याच्या राजकारणात सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यासमोर आव्हानं उभे केले आहे. विधानसभेला पराभूत झाल्यानंतरही त्यांनी जोमाने काम सुरू ठेवले आहे. या तालुक्यात मोहिते पाटील व आमदार उत्तम जानकर हे अगोदरचे विरोधक एकत्र येवून भाजप शी लढत आहे. अशातही सातपुते यांनी अकलूज नगरपरिषद असो की जिल्हा परिषद व पंंचायत समिती निवडणुकीत जोरदार लढत देत भाजप ची ताकद वाढवली आहे. त्यांच्या पत्नी संस्कृती सातपुते या दहिगाव गटातून विजयी झाल्या. त्यांना समाजकल्याण समितीचे सभापतीपद देण्यात आले आहे. या तालुक्यात भाजपचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे असले तरी त्यांनी निवडणुकांमध्ये पक्षाच्या कामापासून स्वतःला अलिप्त ठेवले होते. आता त्यांची विधानपरिषदेची टर्म ही संपत आली आहे. अशा स्थितीत राम सातपुते यांनी पालकमंत्री गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या साथीने पक्षाची ताकद वाढविली आहे. त्यांना विधानपरिषदेवर घेतले जाईल, अशी चर्चा होती.नगरपरिषद , महापालिका, जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा सोलापूर जिल्ह्यात अव्वल ठरला असून याचे श्रेय पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे जात आहे. गेल्या काही महिन्यात करमाळा, माढा, सांगोला, मोहोळ या भागात पक्षाची ताकद वाढली आहे तर माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व आमदार जानकर यांना हा पक्ष आव्हानं देत आहे. काही वर्षांपूर्वी मोहिते पाटील गट जिल्हा परिषदेत महत्वाची भूमिका बजावत होता. मात्र आता भाजप व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा दबदबा वाढला आहे. पक्षाने माढा, माळशिरस, सांगोल्यात जिल्हा परिषदेचे सभापतीपद देत पक्ष विस्ताराचा आपला इरादा स्पष्ट केला आहे. यामुळे आगामी माढा लोकसभा निवडणुकीची तयारी या पक्षाने सुरू केल्याचे चित्र आहे.
माळशिरस तालुका हा मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता परिस्थिती बदलत असल्याचे चित्र आहे. येथील राजकारणात मोहिते पाटील व जानकर एकत्र आले असले तरी भारतीय जनता पक्ष येथे अनेकांना पक्षात आणून ताकद वाढवत आहे. राम सातपुते यांना ताकद देण्याचे काम मुख्यमंत्र्यांसह सर्वच नेते करत आहेत. यामुळे आता आगामी काळात त्यांच्यावर आणखी कोणती जबाबदारी दिली जाणार? याकडे सार्यांचे लक्ष आहे.




