सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे मामाच राहणार, राष्ट्रवादीच्या वरिष्ठांचा निर्णय
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना बदलण्याचा कोणताही विचार राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा नसून उजनीच्या पाण्याचा प्रश्न आता संपला आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातील बैठकीनंतर दिली.
पुण्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. यात विकासकामांवर चर्चा झाली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. यात पालकमंत्रिपदाबाबत कोणताही विषय नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान ते म्हणाले, उजनीतून इंदापूरला पाणी नेण्याचा विषय संपलेला आहे. दत्तात्रेय भरणे हेच सोलापूरचे पालकमंत्री राहतील. सोलापूरच्या काही पदाधिकार्यांनी व लोकप्रतिनिधींनी पवारसाहेबांशी काही कामानिमित्त चर्चा करण्यासाठी वेळ मागितला होता. तो साहेबांनी पुण्यात दिला व यावेळी सोलापूरच्या काही विकास योजना व अन्य बाबींवर चर्चा झाली.
दरम्यान एप्रिल महिन्यात उजनीतून इंदापूर तालुक्यातील बावीस गावांसाठी पुणे जिल्ह्यातून वाहून येणारे पाच टीएमसी पाणी नेण्याची योजना मंजूर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात याचे तीव्र पडसाद उमटले होते व यानंतर आंदोलन झाली. जनप्रक्षोभ पाहून जिल्ह्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या पक्षाच्या आमदारांनी ही यास विरोध केला. यानंतर ही योजना रद्द झाली. मात्र यानंतर जिल्हा राष्ट्रवादीमधून पालकमंत्री हटाव मोहीम सुरू झाली. पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.
पुणे व पिंपरी चिंचवड यासह अन्य स्थानिक स्वराज्य संस्था तसेच औद्योगिक वसाहतीमधून वाहून येणार्या सांडपाण्यापैकी पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याची ही योजना होती. ती बारामती लोकसभा व इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठी मोलाची मानली जात होती. ही योजना उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीशिवाय मंजूर होवू शकली नसती हे वास्तव आहे. असे असताना ही केवळ पालकमंत्र्यांवर खापर फोडले जात होते.
दरम्यान पाण्याच्या आडून सोलापूर राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातील काही आमदारांमध्ये महत्वकांक्षा निर्माण होवून त्यांना मंत्री व पालकमंत्रिपद मिळेल अशी आशा होती अशी चर्चा ही आता रंगली होती. यामुळेच योजना रद्द होवून देखील भरणे यांच्या विरोधात शरद पवार यांच्याकडे तक्रारी करण्यात येत होत्या. कालच सोमवारी भरणे यांनी पवार यांची मुंबईत भेट घेवून चर्चा केली होती.
दत्तात्रेय भरणे यांना पालकमंत्रिपदावरून हटविले जाणार या वृत्ताने धनगर समाजात ही नाराजी होती. पंढरपूरध्ये समाजाच्या काही पदाधिकार्यांनी बैठक घेवून याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सोलापूर, पुणे भागात धनगर समाज मोठ्या संख्येने असून मंत्रिमंडळात केवळ भरणे हेच एकमेव या समाजाचे मंत्री आहेत व सध्या धनगर आरक्षण प्रश्न ही गाजत आहे. अशात भरणे यांना पालकमंत्रिपदावरून काढणे राष्ट्रवादीसाठीही जिकरीचे बनले असते.