विशेष

धनगर आरक्षण प्रश्‍न चिघळला, मुख्यमंत्र्यांना आषाढीच्या महापूजेला रोखण्याचा कृती समितीचा इशारा


पंढरपूर –  राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्‍न गाजत असताना आता धनगर समाजाने ही आरक्षणाच्या मुद्दयावर आपला आवाज उठविला असून मराठा आरक्षणासाठी जे विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा घ्यावा,अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीने केली असून जर यावर निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे यंदाच्या आषाढीला महापूजेसाठी पंढरीत आल्यावर त्यांना रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.
धनगर आरक्षण कृती समितीची मंगळवारी येथील होळकर वाड्यात बैठक बोलाविण्यात आली होती. यात राज्य सरकारने धनगर आरक्षणाबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. धनगर व धनगड समाज हे एकच असून केवळ महाराष्ट्रात धनगर असे संबोधले जाते. तर अन्य राज्यात धनगड समाज हा अनुसूचित जमातीत मोडत आहे. यामुळे राज्य सरकारने येथे धनगर व धनगड एकच आहे असा ठराव करून केंद्र सरकारला तसा अहवाल द्यावा व धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना कृती समितीच नेते आदित्य फत्तेपुरकर यांनी सांगितले की, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विधानसभेचे खास अधिवेशन बोलाविण्याच्या तयारीत आहे, यामध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा ही त्यांनी घ्यावा. अनुसूचित जमातीच्या सूचित ज्या धनगड समाजाचा उल्लेख आहे तो मुळात धनगर समाज असून केवळ महाराष्ट्रात ड ऐवजी र लिहिल्याने धनगर असा उल्लेख केला जातो.  र व ड असा शब्दांचा तो फरक आहे. तो राज्य सरकारने काढून याबाबतचा अहवाल केंद्राला पाठवावा व धनगर आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावावा. जर हा प्रश्‍न सुटला नाही तर समाज मुख्यमंत्र्यांना यंदाच्या आषाढी एकादशीला महापूजेला पंढरपूरला येताना रोखेल. याबाबत आजच्या बैठकीत कृती समितीच्या सदस्यांनी निर्णय केला आहे. यावेळी परमेश्वर कोळेकर , राजाभाऊ उराडे, शालीवाहन कोळेकर, द्रोणाचार्य हाके ,सोमनाथ ढोणे, पंकज देवकते ,महेश येडगे, बालाजी येडगे, पांडुरंग भेंकी, संजय लवटे, आण्णा सलगर उपस्थित होते.


दरम्यान पंढरपूरमध्ये यंदाच्या आषाढीला धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजणार असे दिसत आहे. यापूर्वी 2018 ला मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावरून पुकारलेल्या आंदोलनामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरला आषाढीच्या महापूजेसाठी येता आले नव्हते. आता 2021 ला धनगर आरक्षणा प्रश्‍न गाजू लागला आहे. यावर्षी कोरोनामुळे आषाढी यात्रा भरणार नसून केवळ प्रतीकात्मक वारी होणार आहे. एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे गतवर्षीप्रमाणे महापूजेसाठी येण्याची शक्यता असून त्यांना श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आमंत्रण देण्यात आले आहे.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close