इंदापूरची योजना रद्द होताच राष्ट्रवादीला आठवले कृष्णा-भीमा स्थिरीकरण
पंढरपूर – पुणे जिल्ह्यातून उजनीत वाहून येणार्या सांडपाण्यापैकी पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील बावीस गावांना देण्याची योजना सोलापूर जिल्ह्याच्या विरोधामुळे रद्द होताच आता राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला कृष्णा भीमा स्थिरीकरणाची आठवण झाली असून पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी ही योजना आवश्यक असून ती राबविली जाणे गरजेचे असल्याचे सांगत आपण यासाठी आग्रही असल्याचे सांगितले. दरम्यान 2004 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या योजनेला दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचे 2014 पर्यंत सरकार असताना बासनात गुंडाळून ठेवण्यात आले होते. मात्र आता याची आठवण राष्ट्रवादीला झाल्याचे दिसत आहे.
उजनी धरणावर अनेक योजनांचा ताण पडत असून यातील पाण्याला मागणी वाढत असल्याने यात पाणी आणणारी कृष्णा भीमा स्थिरीकरणासारखा प्रकल्प आवश्यक आहे. याबाबत पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना विचारले असता त्यांनी शंभर टक्के कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना राबविली गेली पाहिजे असा आग्रही भूमिका शुक्रवारी पंढरपूरला पत्रकारांशी बोलताना मांडली. यावेळी त्यांना सदरची योजना विजयसिंह मोहिते पाटील यांनी आखल्याने यास राष्ट्रवादी पाठिंबा देईल का? असे विचारले असता भरणे म्हणाले, ही योजना कोणी आणली.. असे कोणाचे नाव घेण्यापेक्षा ती शेतकर्यांसाठी हितावह असल्याने ती राबविली गेली पाहिजे. यात राजकारण आणण्याची गरज नाही. यावेळी भरणेमामा यांनी या योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची नावे घेतली तर पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांचाच यात विषय जास्त असल्याने याबाबतीत पक्षीय राजकारण यात नको, असे आवाहन केले.
दरम्यान सत्तेत असताना कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला आघाडी सरकारने कधीही विशेष महत्व दिले नव्हते. ही योजना सतत मोहिते पाटील यांचीच असल्याच्या नजरेतून याकडे पाहिले. आता इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्यास वाढणारा सोलापूरचा विरोध, नीरेचे पाणी बोगद्यातून उजनीत आणून ते मराठवाड्याला देण्याची पूर्ण होत चालली योजना पाहता आता सार्यांना कृष्णा भीमा स्थिरीकरणाची आठवण होवू लागली आहे. 2004 मध्ये 5 हजार कोटी रूपयांची असणारी ही योजना आता 25 हजार कोटींच्या घरात गेली असावी असा अंदाज आहे. आता योजनेची गरज सार्यांना भासू लागली आहे.
दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यासह अन्य भाग व मराठवाडा यांना जलसमृद्ध करण्यासाठी कृष्णा आणि भीमा या दोन व त्यांच्या उपनद्या जोडून 103 टीएमसी पाणी उपलब्ध करणारी ही योजना आहे. या प्रकल्पामुळे सांगली जिल्ह्यातील तासगांव, मिरज, कवटे महांकाळ, जत, खानापूर व आटपाडी, सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव व कोरेगांव, पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, माढा, करमाळा, उत्तर व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व बार्शी तर मराठवाड्यातील उस्मानाबाद, परांडा, बीड या तालुक्यांचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटणार असून पाच लाख 50 हजार 290 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होवू शकतो.तसेच अतिरिक्त पाण्यामुळं वाढीव लाभक्षेत्र निर्माण होईल, ते किती असेल याचा अंदाज बांधण्यात आला आहे. उजनीला या योजनेतून 46 टीएमसी वाढीव पाणी मिळेल. त्यातून तीन लाख क्षेत्र भिजण्यास मदत झाली असती.
नीरा , टेंभू उपसा सिंचन योजनेला यातून पाणी मिळू शकले असते. महायुतीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना पूर्णत्वास नेण्याचा निर्धार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या पातळीवर याबाबतचा पाठपुरावा करून जागतिक बँकेच्या वतीने निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे प्रयत्न या योजनेसाठी सतत सुरू असतात.