खासदार व आमदार मतदार संपर्कासाठी गावभेट दौऱ्यावर, चांगला प्रतिसाद
पंढरपूर- माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आज 11 एप्रिल पासून दोन दिवसांचा सांगोला दौरा सुरू केला असून खासदार व आमदार आपल्या दारी असा हा उपक्रम आहे.
लोकसभा निवडणूक एक वर्षावर आली असताना निंबाळकर हे प्रत्येक तालुक्यात गावोगावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी आमदार आपल्या दारी हा उपक्रम शहाजीबापू पाटील यांनी काही दिवसापूर्वीच राबविला होता, आता लोकसभा निवडणूक पाहता भाजपने माढा मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात गावोगावी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न खासदारांकडून सुरू आह. गेल्या काही दिवसात सिंचनाचे मंजूर झालेले प्रकल्प तसेच रस्त्यांची काम रेल्वे प्रकल्प यासह अन्य विकास कामांची माहिती मतदारांना खासदार व आमदार देत आहेत. खासदार नाईक निंबाळकर व आमदार पाटील यांनी मंगळवार सकाळपासून सांगोला तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या आहेत. त्यांचे ठीक ठिकाणी उस्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
हा दौरा दोन दिवस सुरू राहणार असून बुधवार सायंकाळी याचा समारोप होणार आहे. निंबाळकर यांनी यापूर्वी फलटण भागातही असे दौरे केले आहेत. सांगोला उपसा सिंचन योजना यासह येथे मंजूर होत असलेले अन्य प्रकल्प यावर या गाव भेट दौऱ्यात चर्चा झाली. गेल्या चार वर्षात केंद्रातील भाजप सरकारने तसेच राज्यात आता असणाऱ्या भाजप शिवसेना सरकारने केलेली काम यावेळी मतदारांसमोर मांडली जात आहेत. यानंतर अन्य तालुक्यातही खासदार निंबाळकर दौरे करणार आहेत. यामुळे आमदार व खासदार या दोघांचाही मतदारसंघात थेट मतदारांशी संपर्क होत असल्याने समस्या ही लक्षात येत आहेत. खासदार निंबाळकर यांनी मागील काही दिवसात माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यासाठी सिंचन योजना याचबरोबर महामार्गांचे प्रश्न ,रेल्वे प्रकल्प , निरा देवघरचा प्रश्न मार्गी लावला आहे. याबाबतची माहिती ते या दौऱ्यात देत आहेत.