दिलीप धोत्रे यांना निष्ठेचे फळ, राज ठाकरेंनी केली मनसेच्या नेतेपदी नियुक्ती
पंढरपूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्वोच्च अशा मनसे नेतेपदी निवड केली असून मुंबई येथील कृष्णकुंज निवस्थानी त्यांना निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. धोत्रे हे मागील 29 वर्षांपासून ठाकरे यांच्यासमवेतच काम करत असल्याने त्यांना निष्ठेचे फळ मिळाल्याचे दिसत आहे.
1992 पासून दिलीप धोत्रे यांनी राज ठाकरे यांच्यासमवेत भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून काम सुरू केले ते आजतागायत त्यांच्या समवेतच आहेत. मनसेच्या स्थापनेनंतर त्यांच्यावर मागील काही वर्षात विविध जबाबदार्या देण्यात आल्या आहेत. आता त्यांना मनसेचे नेते असा मान दिला गेला आहे. सोलापूर जिल्ह्यात त्यांनी कोरोना काळात हजारो कुटुंबाना मदत केली आहे.
राज ठाकरे यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती प्रामाणिकपणे मी पार पाडेन, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. एकनिष्ठतेचे हे फळ आहे, अशी प्रतिक्रिया धोत्रे यांनी निवडीनंतर दिली.