राजकिय

मोदी-ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध चांगले असल्याने दिल्लीतील भेटीबाबत राज्यात चर्चेला ऊत


भारतीय जनता पक्षाने अनेक राज्यात सत्ता मिळविण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरल्या आहेत. बिहारमध्ये 2015 ला नितीश कुमार व लालूप्रसाद यादव याचे महागठबंधन  निवडणूकपूर्व युती करून बहुमताने सत्तेवर आले असताना ही वर्ष संपता संपता नितीश कुमार यांनी महागठबंधनाचे बंधनच तोडून पुन्हा एनडीए भाजपासोबत जाणे पसंत केले आणि मुख्यमंत्रिपदी राहिले. 2020 ला त्यांच्या जेडीयू पक्षाला केवळ 43 जागा मिळून देखील 74 जागा जिंकलेल्या भाजपाने त्यांनाच मुख्यमंत्रिपदी विराजमान केले व राज्यातील सत्ता राखली. कर्नाटक व मध्यप्रदेशात सत्ता मिळविताना विरोधी आमदारांना आपल्या बाजूला वळवून तेथे आपले मुख्यमंत्री भाजपाने विराजमान केले आहेत. महाराष्ट्रात मात्र शिवसेना दूर गेल्यानंतर या पक्षासोबत कोणीच आलेले नाही.  यामुळे जास्त जागा जिंकूनही विरोधात बसण्याची पाळी आली आहे. यामुळेच कधी काहीतरी चमत्कार घडेल अशी अशा भाजपाबरोबरच मीडियाला आहे. यामुळेच मोदी व ठाकरे यांच्या नवी दिल्लीतील तीस मिनिटांच्या वैयक्तिक भेटीवरून चर्चा रंगत आहे.


मंगळवारी नवी दिल्लीत राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधील सहकार्‍यांच्या शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठा आरक्षण व अन्य विषयांबाबत भेट घेवून चर्चा केली आणि यानंतर मोदी व ठाकरे या दोघांच्यात तीस मिनिटांची वेगळी बैठक झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळेल अशी चर्चा सुरू झाली आहे. मुळात वैयक्तिक मोदी आणि ठाकरे यांच्यात यापूर्वीही कधी वाद नव्हता. राज्यात जे काही पंधरा महिन्यांपूर्वी घडले होते ते भाजपा व शिवसेनेचा वाद होता.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर फेब्रुवारी 2020 ला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांची सदिच्छा भेट घेतली होती. भाजपाची साथ सोडल्यानंतर आजवर ठाकरे यांनी कधीही मोदींबाबत जाहीर टीका केलेली नाही. ते पंतप्रधानांसमवेतच्या सर्व ऑनलाइन बैठकांमध्ये सहभागी होतात. आपल्या मागण्या मांडतात तसेच त्यांच्या मागण्यांना पंतप्रधान ही प्रतिसाद देतात हे आजवर दिसून आलेले आहे. उध्दव ठाकरे हे सरकार चालवित असून त्यांना केंद्राची मदत किती गरजेची असते याची जाणीव आहे.


ठाकरे व मोदी यांचे संबंध हे आजचे नाहीत. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे संबंध होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी यांची अनेकदा प्रशंसा केली होती तसेच अनेक बाबतीत पाठराखण केल्याचे दिसून आले होते. स्व. बाळासाहेब यांचे आशीर्वाद नेहमीच मोदी यांच्या पाठीशी राहिले आहेत.  मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला देशात मोठे बहुमत  मिळाल्यानंतर या पक्षाने आपल्या विस्तारासाठी सर्वच राज्यात वेगवेगळे प्रयोग सुरू केले. शत् प्रतीशत भाजपा.. असा नारा देण्यात आला. अमित शहा पक्षाध्यक्ष असताना याबाबत देशभरात जोरदार कॅम्पेनिंग करण्यात आले होते. यात महाराष्ट्र मागे नव्हता. येथे याच काळात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता पक्षाला मुख्यमंत्री म्हणून लाभला. प्रचंड महत्वकांक्षा असणार्‍या फडणवीस यांनी राज्यात भाजपाला वाढविण्यासाठी खूप प्रयत्न केले. यामुळे अनेकदा शिवसेनेला पडती बाजू घ्यावी लागली पण लढवय्या पक्ष असणार्‍या शिवसेनेने वेळ आल्यावर आपली ताकद दाखविली.
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपाला 2014 च्या तुलनेत सतरा जागा कमी मिळाल्या. त्यांची गाडी 105 वर अडकली आणि राज्यातील राजकारणाचे वारे फिरले. यातूनच दोन्ही काँगे्रस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीची स्थापना झाली. प्रत्येक राजकीय पक्ष आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत करतच असतो. आता जवळपास पंधरा महिने ही आघाडी राज्यात सत्तेवर आहे. अनेक संकटांना ते सामोरे जावून सत्ता टिकवून आहेत. सतत भाजपाकडून हे सरकार कोसळेल अशी वल्गना होत असते. मात्र अद्याप तरी काही घडलेले नाही. आता पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वैयक्तिक भेटीत काय ठरले याची चर्चा रंगवली जात आहे.
पंतप्रधान मोदी हे नेहमीच विरोधी पक्षातील नेत्यांचे कौतुक करताना आपण पाहिले आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी ज्यांच्याबरोबर काम केले आहे त्यांना भेटणे , चर्चा करणे हा त्यांचा स्वभाव आहे. ठाकरे कुटुंबासोबत त्यांचे जुने संबंध आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच मोदी यांची पाठराखण केली होती. हे ते विसरले नसणार. आज उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरी ते शिवसेना पक्षप्रमुख असल्याने त्यांची वैयक्तिक भेट घेणे यात मोदी यांना काहीच गैर वाटले नसणार. राजकारणात उंची गाठलेल्या नेत्यांना पक्षाच्या भिंती आडव्या येत नसतात हे नेहमीच सांगितले जाते.
दरम्यान या भेटीनंतर महाराष्ट्रात चर्चा तर रंगणार हे निश्‍चित असून यातून प्रत्येकजण आपल्या सोयीने अर्थ काढणार. काहींच्या मते ठाकरे व मोदी यांच्यात चर्चा होवून पुन्हा युतीचे सरकार येवू शकते तर काहींच्या मते महाविकास आघाडीतील अन्य पक्षांना ठाकरे यांनी वैयक्तिक मोदींची भेट घेवून इशारा दिला असेल… आता काय खरे आणि काय खोटे सार्‍या चर्चाच. जे काही घडले आहे ते त्या दोघांनाच ठाऊक…    

Header

Related Articles

Back to top button
Close
Close