ग्रामीणची कोरोनास्थिती पाहता यंदाची आषाढीही प्रतीकात्मकच होण्याची शक्यता ,शासन निर्णयाकडे सार्यांचे लक्ष
पंढरपूर – कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरू लागली असली तरी अद्याप याचा धोका अद्याप संपला नसल्याने यंदाची आषाढी वारीही प्रतीकात्मकच होण्याची शक्यता असून शासन याबाबत आपला निर्णय जाहीर करणार आहे. येत्या दोन दिवसात याची घोषणा होईल.
कोरोनामुळे मार्च 2020 पासून पंढरपूरच्या यात्रा भरलेल्या नाहीत. त्या प्रतीकात्मकच साजर्या झाल्या आहेत. मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद असले तरी या काळातही सण, यात्रा व उत्सव काळात श्री विठ्ठल व रूक्मिणीच्या मंदिरात आकर्षक रोषणाई तसेच सजावट केली जाते. तसेच नित्योपचार ही परंपरेनुसारच होत आहेत. मागील वर्षीच्या सर्व यात्रा रद्द झाल्या होत्या. तर यंदा कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे पुन्हा यात्रेवर या विषाणूचे सावट पसरले आहे.
राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. यामुळेच दोन महिने कडक निर्बंध होते. आता यात जिल्हा व मोठ्या शहर निहाय आढावा घेवून काही शिथिलता दिली गेली असली तरी कोरोनाचे संकट पूर्णतः संपलेले नाही. रूग्णसंख्या निश्चितपणे कमी झाली आहे. यातच आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसर्या लाटेचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे आता 2021 ची आषाढी यात्रा होण्याची शक्यता धूसरच बनली आहे.
वारकरी संप्रदायातील काही महाराज मंडळींनी पायी वारीला परवानगी देण्याची मागणी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेतली असून यानंतर वारकरी व प्रशासकीय अधिकार्यांची समिती गठीत केली आहे. याचा अहवाल ही शासनाला सादर केला जाणार आहे. असे असले तरी पालखी मार्गांवरील अनेक गावांनी व नगरपरिषदांनी पायी पालखी सोहळे नको अशी मागणी केली आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत सर्वत्र ग्रामीण भागातच रूग्णसंख्या मोठी होती. अद्याप ही यातून अनेक गावे सावरलेली नाहीत. पालखी मार्गावरील शहर व गावे देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडल्याची चित्र होती. यामुळे आता या गावांमधून पायी वारी नको असा सूर उमटत आहे.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संबंधित विभाग हे याबाबतचा निर्णय घेणार असून येत्या दोन दिवसात तो जाहीर केला जाईल. आषाढीचे पालखी सोहळे हे वारीपूर्वी अनेक दिवस अगोदरच पायी आपआपल्या ठिकाणाहून पंढरपूरसाठी निघत असतात. हे पाहता पायी वारीबाबतचा निर्णय शासन लवकरच घेईल असे दिसत आहे.
दरम्यान ज्या पंढरपूर शहरात आषाढी यात्रा भरते ते शहर व तालुका हा सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा भाग म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात सर्वात जास्त रूग्ण याच तालुक्यात 24 हजार 427 इतके आढळून आले आहेत तर आजवर 465 जणांनी आपले प्राण या आजारात गमावले आहेत. पालखी मार्गावरील जिल्ह्यातील माळशिरस तालुका हा कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत क्रमांक दोनवर असून येथे आजवर 22 हजार 390 रूग्ण आढळून आले आहेत. अद्यापही या तालुक्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळूनच येत आहेत. 8 जून च्या अहवालानुसार माळशिरस तालुक्यात 80 तर पंढरपूर तालुक्यात 63 रूग्ण आढळून आले आहेत.
पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील कोरोनाची स्थिती पाहता पायी वारी सोहळे परवडणारे नाहीत. याच बरोबर पंढरपूर शहरात ही आजवर 8099 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे येथे आषाढीची गर्दी परवडणारी नाही. याचा विचार करून यंदाची यात्रा ही प्रतीकात्मकच होईल असे दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एकादशीच्या महापूजेचे निमंत्रण मंदिर समितीने दिले आहे. मागील वर्षीही भाविकांनीसाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते मात्र शासकीय महापूजा परंपरेप्रमाणे झाली होती. याही वर्षी कदाचित अशीच स्थिती असण्याची शक्यता आहे.