सांगोल्यात राष्ट्रवादीचा प्रभाव वाढवा; २०२४ च्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आवाहन
सांगोला – स्व. गणपतराव देशमुख यांना पाठिंबा देण्याचे काम अनेक वर्षे या सांगोला मतदारसंघात राष्ट्रवादीने केले आहे. त्यांनी तपस्वी काम केले आहे मात्र त्यांच्यानंतर आता या मतदारसंघात अधिक प्रभावी काम करण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
गणपतआबा देशमुख यांनी वर्षांनुवर्षे या सांगोल्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. या दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवावे यासाठी आबांनी प्रयत्न केला. कालांतराने या भागात टेंभूचे पाणी आले, म्हैसाळचे पाणी आले. आज आबा हयात नाहीत मात्र दिपकआबा साळुंके या भागात अधिकचे पाणी यावे यासाठी प्रयत्नशील राहतात. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून त्यांचा नेहमीच पाठपुरावा असतो. सांगोल्याच्या सर्व गावांना पाणी मिळावे अशी त्यांची मागणी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात या भागासाठी विशेष बैठक घेतली जाईल व या भागातील जास्तीत जास्त मागण्या दीपक आबांच्या उपस्थितीत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिल असे आश्वासनही जयंत पाटील यांनी दिले.
२०२४ च्या निवडणुकीसाठी आपण सज्ज रहायला हवे, त्यासाठी आपले सैन्य तयार पाहिजे आणि म्हणून बुथवर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक बुथवर राष्ट्रवादी प्लसमध्ये पाहिजे, जर आपण मायनसमध्ये जात असाल तर का मायनसमध्ये जातोय याचा अभ्यास करण्याची गरज आहे असेही जयंत पाटील म्हणाले. पवारसाहेबांच्या प्रत्येक निर्णयाला आपण पाठिंबा दिला आहे. यापुढेही द्याल याची मला खात्री आहे. दिपकआबा यांनी राष्ट्रवादीची ताकद कायम ठेवली आहे. या मतदारसंघात बदल घडवण्याचे काम आपल्याला करायचे आहे.
पवारसाहेबांच्या प्रत्येक निर्णयाला आपण पाठिंबा दिला आहे. यापुढेही द्याल याची मला खात्री आहे. दिपकआबा यांनी राष्ट्रवादीची ताकद कायम ठेवली आहे. या मतदारसंघात बदल घडवण्याचे काम आपल्याला करायचे आहे.
सांगोला तालुक्यातील जास्त गावे पाण्याखाली आली पाहिजे यासाठी दिपकआबा साळुंखे यांनी सांगितल्यावर प्रयत्न करतोय. नादुरुस्त बंधारे दुरुस्तीलाही मान्यता दिली आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला आज सांगोला येथून सुरुवात झाली.
सांगोला विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला.माजी आमदार दिपकआबा साळुंखे यांनी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे व जलसंपदा विभागाच्या कामाची निवेदन सादर केली.यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदींनी आपले विचार मांडले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, आदींसह पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, माजी आमदार दिपकआबा साळुंखे, प्रदेश उपाध्यक्षा जयमालाताई गायकवाड, भगीरथ भालके,जिल्हा प्रभारी सुरेश घुले आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.