पंढरपूर तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस, सरासरी 22.55 मि.मी. ची नोंद
पंढरपूर – गुरुवारी दुपारी व रात्रीपर्यंत पंढरपूर शहरासह तालुक्यात सर्वदूर सरासरी 22.55 मिलीमीटर इतक्या मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली आहे. गेले काही दिवस पंढरपूर शहर व परिसरामध्ये हवामान ढगाळ होत होते. मात्र पाऊस पडत नव्हता. जिल्ह्याच्या इतर भागात पर्जन्यराजा सक्रिय असताना पंढरपूर भाग मात्र कोरडा होता. गुरुवारी 16 मे रोजी दुपारी साडेचार नंतर पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. रात्री दहा वाजेपर्यंत हा मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता. वारे नसल्यामुळे बराच काळ पाऊस पडत राहिला. तालुक्यात सर्वाधिक जास्त पाऊस तुंगत मंडलामध्ये नोंदला गेला असून तेथे 38 मिलिमीटर ची नोंद आहे. या पाठोपाठ पटवर्धन कुरोली 36, भाळवणी 29, करकंब 18, चळे 19 , पंढरपूर 19 कासेगाव 11, भंडीशेगाव 17 तर पुळुज मंडलामध्ये 16 मिलिमीटर अशा एकूण 203 मिलीमीटर पावसाची नोंद रात्रीपर्यंत झाली होती.
तालुक्यात एकाच दिवशी सरासरी 22.55 मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असून लवकरच महाराष्ट्रामध्ये मान्सूनही दाखल होईल अशी आशा आहे. यंदा केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर महाराष्ट्रामध्ये त्याचे आगमन 12 ते 13 जून च्या दरम्यान होऊ शकते. सध्या अवकाळी म्हणजेच मान्सूनपूर्व पाऊस विविध भागांमध्ये कोसळत आहे, या पावसामुळे शेतीला फायदा होणार आहे. यंदा तीव्र पाणीटंचाई असून यातच हा चांगला पाऊस झाल्याने पंढरपूर तालुक्याला दिलासा मिळाला आहे.