सांगोला व पंढरपूरला देवघरचे पाणी मिळण्यावर शिक्कामोर्तब !
माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व पाणीप्रश्न सोडविण्यावर भर : खा. निंबाळकर
पंढरपूर – 31 जानेवारी रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत पंढरपूर व सांगोला तालुक्यास निरा देवघरचे अतिरिक्त पाणी मिळावे यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती. तर आता या मिनिट्स बुक वर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सह्या होऊन शिक्कामोर्तब झाले असून या दोन तालुक्यांचा निरा देवघर लाभक्षेत्रात समावेश झाला असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
यासाठी आमदार शहाजी पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान दादा आवताडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. दरम्यान त्याच बैठकीत सांगोेला उपसा सिंचन योजनेचा अहवाल ही कालमर्यादेत शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याचे कामही वेगाने सुरू आहे. यामुळे दुष्काळी पट्ट्यातील पाणी योजनांची कामे मार्गी लागत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातील पाण्याबाबतची जी कामे प्रलंबित होती ती लवकरात लवकर मार्गी लावली जात आहेत.
कुकडी लाभक्षेत्रातील करमाळा तालुक्याच्या उत्तर भागातील गावांना पाणी पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले असून याचे कामही सुरू आहे. कुकडीचा डावा कालवा 223 कि.मी. ते 249 कि.मी. हा करमाळा तालुक्यातून जात असून आतापर्यंत सतरा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. वनविभागाच्या जमिनीचा प्रश्न असल्याने बोंदवडे येथून बोगदा काढून पाणी वहन केले जाणार आहे. डिसेंबर 2023 पर्यंत ही योजना पूर्ण होणार असून यानंतर करमाळा तालुक्यातील आणखी पाच हजार हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे. मार्च महिन्यात या बोगद्यात पाणी सोडून चाचणी घेतली जाणार आहे.
याचबरोबर माढा व करमाळा तालुक्याला निरा देवघरचे शिल्लक राहणारे एक टीएमसी पाणी हे माढा व करमाळा तालुक्याला मिळावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. हे पाणी येथे आणण्यासाठी कृष्णा मराठवाडा योजनेच्या उध्दट तावशी बॅरेज व उजनीपर्यंत तयार करण्यात आलेल्या तेवीस किलोमीटरच्या बोगद्याचा वापर केला केला जावू शकतो. याबाबत राज्य सरकार अनुकूल आहे. खा.निंबाळकर हे या योजनेसाठीही प्रयत्नशील आहेत.