लाखो वैष्णवांसह पालखी सोहळे पंढरीत दाखल , नागरिकांकडून स्वागत

पंढरपूर – आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी आलेले पालखी सोहळे शुक्रवार ४ जुलै रोजी वाखरीतून लाखो वैष्णवांसह शनिवारी दशमी दिवशी पंढरपूर मध्ये दाखल झाले.
इसबावी येथील पादुका मंदिराजवळ सर्व संतांच्या मांदियाळीला श्री क्षेत्र पंढरपूरला घेवून जाण्यासाठी संत नामदेव महाराज दुपारी १२ वाजता येऊन दाखल झाले होते. आपण आल्याची दवंडी त्यांनी सर्व मानाच्या पालख्याना दिली आणि दुपारी १ वाजता संतांचे पालखी सोहळे पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करु लागले .
सर्वात अग्रभागी संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा चालत होता. त्यामागे मुक्ताईनगरहून निघालेला संत मुक्ताबाईचा पालखी सोहळा आपल्या सुमारे ५० हजार वारकऱ्यांसह चालत होता . मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्या बरोबर श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्रभैय्या पाटील , पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांच्यासह वारकरी चालत होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती .

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून निघालेला संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा आज ( शनिवारी ) सकाळी इसबावी येथे पोहोचला. दुपारच्या भोजना नंतर हा सोहळा सुमारे १ लाख वारकऱ्यांसह पंढरपूरकडे मार्गस्थ झाला . या सोहळ्यात श्री संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष ॲड सोमनाथ घोटेकर , सचिव श्रीपाद कुलकर्णी , विश्वस्थ जयंत महाराज गोसावी , सोहळा प्रमुख गोकुळ गांगुर्डे यांच्यासह वारकरी सहभागी झाले आहेत .
श्रीक्षेत्र पैठणहून निघालेला संत एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी सकाळी इसबावी येथे दाखल झाला . दुपारच्या भोजना नंतर सुमारे लाख ते सव्वालाख वारकऱ्यांसह हा सोहळा दुपारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. सोहळ्यासोबत पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी , योगेश महाराज गोसावी यांच्यासह भाविक सहभागी झाले आहेत .
श्री क्षेत्र सासवडहून निघालेला संत सोपानदेव यांचा पालखी सोहळा शनिवारी दुपारी १२ वाजता वाखरीतून श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाला . सोहळ्या बरोबर सुमारे दीड ते दोन लाख वारकरी असून सोहळा प्रमुख ॲड. त्रिगुण महाराज गोसावी , प्रमुख विश्वस्थ गोपाळराव गोसावी यांच्यासह लाखो वारकरी सोहळ्यात सहभागी झाले आहेत . इसबावी येथील उभ्या रिंगण सोहळ्यानंतर हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला .
श्री क्षेत्र देहुहून निघालेला संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा वाखरीतुन दुपारी १ वाजता निघाला. सोहळ्या समवेत संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे , सोहळा प्रमुख गणेश मोरे , वैभव मोरे , दिलीप मोरे यांच्यासह सुमारे तीन ते साडेतीन लाख वारकरी सहभागी झाले आहेत . सायंकाळी साडेपाच वाजता हा सोहळा उभ्या रिंगणासाठी इसबावी येथे पोहोचला. अश्वानी नेत्रदीपक दौड करीत सोहळ्यात रंग भरला. आरतीनंतर हा सोहळा पंढरपूर मुक्कामी मार्गस्थ झाला .
श्री क्षेत्र आळंदीहून निघालेला संत ज्ञानदेवांचा पालखी सोहळा आपल्या सुमारे पाच लाख वैभवी लवाजम्यासह दुपारी २ . ३० वाजता वाखरीहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाला . वाखरी तळावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माउलींचे दर्शन घेतले व पालखी खांद्यावर घेतली. सायंकाळी चार वाजता पालखी सोहळा पुरंदरे मळ्याजवळ पोहोचल्या नंतर माउलीची पालखी मुख्य रथातून भाटेंच्या रथात ठेवण्यात आली . हा रथ वडार समाजाच्यावतीने ओढण्यात आला . हा रथ सायंकाळी सव्वा सहा वाजता इसबावी येथे आला . सोहळ्यात प्रचंड गर्दी असल्याने सोहळ्यातील हे शेवटचे रिंगण पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लाखो भाविकांनी गर्दी केली होती . वारकरी व भाविक यांना आवरताना पोलिसांची मात्र दमछाक झाली . सायंकाळी साडेसहा वाजता अश्वाना उभ्या रिंगणात सोडण्यात आले . पालखी सोहळ्यातील हे शेवटचे उभे रिंगण माउली.. माउली ..नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात पार पडले . आरती नंतर माऊलीच्या पादुका एका नवीन वस्त्रात बांधून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात देण्यात आल्या . शितोळे सरकार यांच्या एका बाजूला सोहळ्याचे मालक आरफळकर तर दुसऱ्या बाजूला वासकर उभे राहिले व या पादुका घेऊन त्यांनी इसबावी ते पंढरपूर अशी वाटचाल केली . या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती . या पादुका रात्री श्री ज्ञानेश्वर मंदिरात आणण्यात आल्या . रात्री आरतीनंतर सर्व संतांचे पालखी सोहळे श्री क्षेत्र पंढरीत विसावले आहेत .





