आषाढी एकादशीच्या महासोहळ्याला विक्रमी गर्दी , दशमीपर्यंत १५ लाख भाविक

आषाढी एकादशीच्या महासोहळ्याला विक्रमी गर्दी
पंढरपूर –
ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा |
चला पाहू रे सोहळा पंढरीचा ||
असा भाव मनात ठेवून लाखो भाविकांसह संतांच्या पालख्या शनिवारी सायंकाळी विठुरायाच्या नगरीत दाखल झाल्या. दरम्यान दशमीपर्यंत पंढरपुरात किमान 12 लाख भाविक आले असावेत, असा अंदाज आहे. यात आणखीन मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाची यात्रा विक्रमी भरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह पत्नी करणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस हे शनिवारी दुपारी पंढरपूर मध्ये दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी वाखरी येथे जाऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शनही घेतले. शनिवारी दशमी दिवशी संत भेटीनंतर सर्व संतांच्या पालख्या या पंढरीच्या दिशेने निघाल्या होत्या. सायंकाळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यांचे पंढरपूर मध्ये आगमन झाले. विसावा या ठिकाणी पालखी सोहळ्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उभे रिंगणही पार पडले.
आषाढी एकादशीची शासकीय महापूजा रविवारी पहाटे पार पडणार असून यासाठी मंदिर समितीच्यावतीने जयत तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान यंदाची आषाढी यात्रा ही विक्रमी भरली असून दशमी दिवशीच १५ लाखाहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले असावेत असा अंदाज आहे. अद्यापही राज्यभरातून भाविक येथे पोहोचत आहेत. यंदा राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळे आषाढी यात्रा विक्रमी भरेल ,असा अंदाज सुरुवातीपासूनच वर्तविला जात होता. पालखी सोहळ्यांसमवेतही यंदा भाविकांची गर्दी जास्त आहे.

पालखी सोहळे पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर संपूर्ण पंढरपूर शहर वारकरीमय झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार किमान वीस ते बावीस लाख भाविक पंढरपूरला येतील. त्या दृष्टीने जोरदार तयारी येथे करण्यात आली आहे. भाविकांना पंढरपूरमध्ये आणण्यासाठी राज्यभरातून सुमारे 5 हजार 200 बसेस धावत आहेत तर रेल्वेने ही जादा गाड्यांची सोय केली आहे.
श्री विठ्ठलाची पदस्पर्शदा रांग ही गोपाळपूरच्या पुढे गेली असून हजारो भाविक या रांगेत उभे आहेत.
आषाढी एकादशीच्या महासोळ्यासाठी प्रशासन सज्ज असून आठ हजाराहून अधिक सुरक्षा कर्मचारी येथे तैनात करण्यात आले आहेत. यासह विविध पथक कार्यरत झाली आहेत. स्वच्छतेसाठी दीड हजार कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत.
उजनीतून सोडण्यात येणारे पाणी बंद केल्याने चंद्रभागा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. यामुळे भाविकांना पवित्र स्नान करणे शक्य होत आहे. दशमी दिवशी चंद्रभागेला भक्तीचा महापूर आल्याचे चित्र होते. लाखो भाविकांनी चंद्रभागेत स्नान केले आहे. या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून 200 हून अधिक जीवरक्षक व यांत्रिक बोटी प्रशासनाने तैनात केल्या आहेत.
आषाढीच्या महासोळ्यासाठी व्यापाऱ्यांनीही यात तयारी केली असून प्रासादिक वस्तूंसह विविध दुकान सजली आहेत. येथे मोठ्या प्रमाणात व्यापार होत असल्याचे सांगितले जात आहे.

