विजयी नव्हे हा तर रुदाली मेळावा : फडणवीस, उध्दव ठाकरेंवर टीका तर राज ठाकरेंचे मानले आभार

पंढरपूर – दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचे श्रेय राज ठाकरे यांनी मला दिल्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत. यासाठी श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील. मात्र आज झालेला मेळावा हा मराठी साठी नसून तो रुदाली होता ,अशी प्रखर टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
मुख्यमंत्री फडणवीस हे आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी शनिवारी दुपारी पंढरपूरला आले असता त्यांनी वाखरी पालखी तळावर जाऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आजच मुंबईमध्ये उद्धव व राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मराठी विजय मेळावा पार पडला याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, आजचा मेळावा हा विजयी मेळावा नव्हता तर तो रुदाली होता. येथे मराठी विषयी एकही शब्द बोलला गेला नाही. आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पाडलं ,आम्हाला सत्ता द्या ,आम्हाला निवडून द्या, अशी रुदाली येथे सुरू होती, असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 25 वर्ष महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असूनही ते कोणतेही ठोस काम करू शकले नाहीत. आम्ही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा चेहरा मोहरा बदलला आहे. अनेक कामे केली आहेत. ठाकरेंच्या काळात मुंबईतील मराठी माणूस हद्दपार झाला होता. मात्र आम्ही बीडीडी , पत्राचाळ ,अभ्युद्यय नगर मधील मराठी माणसाला त्याच ठिकाणी मोठी घर देवू केली आहेत, याची ठाकरे यांच्या मनात असूया आहे. म्हणूनच मी नेहमी सांगत असतो, ये पब्लिक है सब जानती है | मुंबईतला मराठी अथवा अमराठी माणूस सर्वजणच आमच्या सोबत आहेत.
आम्ही मराठी आहोत ,आम्ही मराठी असण्याचा आम्हाला अभिमान आहे. मराठी भाषेचा अभिमान आहे. त्याचबरोबर आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे. आमचे हिंदुत्व हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे , माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.

चौकट
आषाढी यात्रा नियोजनाचे कौतुक
यंदाच्या आषाढी यात्रेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने पंढरपूर व पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिले आहेत, याचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते म्हणाले, मोठ्या प्रमाणात येथे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचे श्रेय पालकमंत्री व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना जाते. यात्रेनंतर बैठक घेवून काही त्रुटी राहिल्या असतील तर यावरही विचारमंथन करून पुढील यात्रेमध्ये त्या सुधारल्या जातील.

