माउलींच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त, पंढरपूरमध्ये श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन

पंढरपूर दि.29 – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर व श्री ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग – सामूहिक चिंतन महाप्रकल्प, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त 4 व 5 ऑक्टोंबर 2025 रोजी श्री संत तुकाराम भवन, पंढरपूर येथे श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
सदर राज्यस्तरीय संमेलनाबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे मंदिर समितीची सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यास सदस्या शकुंतलाताई नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड.माधवीताई निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी दुपारी 4 वाजता उद्घाटन सोहळा पार पडेल. यावेळी आचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे संमेलनाची भूमिका विषद करतील, तर ह.भ.प.चंद्रशेखर महाराज देगलूरकर बीज भाषण देतील. ह.भ.प. भागवत महाराज साळुंके यांच्याकडून श्री निवृत्ती – ज्ञानदेव संवाद होईल.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध परिसंवाद व व्याख्याने होणार आहेत. यात डॉ.दिलीप धनेश्वर यांचा परिसंवाद होणार असून, त्यामध्ये उल्हास घोडके – श्री ज्ञानेश्वर महाराज निरुपित कर्मयोग, इंदुताई खेडकर – श्री ज्ञानेश्वर महाराज निरोपित भक्तीयोग, प्रा. सुदाम देवखिळे – आत्मसंयमयोग संकल्पना आणि स्वरूप, सुचित्रा भालेराव – ज्ञानविज्ञान: विचार आणि जाण, संजय खेले – संप्रदाय पांघुरौनी यांचा सहभाग असणार आहे. यासोबत श्रीमद् भगवद्गीता व ज्ञानेश्वरीतील पात्रांचा तौलनिक विचार या विषयांवर ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प.जयवंत महाराज बोधले श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित अमृतानुभव, तर डॉ. मीनाक्षी पाटील श्री चांगदेव पासष्टी या विषयांवर व्याख्याने देतील.
राज्यस्तरीय संमेलन मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून, उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते होणार आहे तर कार्यक्रमाचा समारोप जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
ह.भ.प.उमेश बागडे हे कार्यक्रमाचे समन्वयक असणार आहेत.कार्यक्रमास ह.भ.प.अभय महाराज टिळक यांचे मनोगत ऐकायला मिळणार असून डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे संमेलनाचा संपूर्ण आढावा सादर करतील. त्यानंतर संत पूजन, आभार प्रदर्शन व सामूहिक पसायदानाने संमेलनाची सांगता होईल ,असे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले. सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहे.




