भेटीत गुप्तता मोठी, आधी दिल्लीत फडणवीस शहांकडे नंतर मोदी-पवार यांच्यात खलबत.. काही शिजतयं का?
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मराठा आरक्षण व राज्याच्या अन्य प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी महाविकास आघाडीतील मंत्र्यांसमवेत गेले होते. यावेळी त्यांची मोदींसमवेत खासगी भेट ही घडवून आणण्यात आली. यामुळे राज्याच्या राजकारणात भाजपा व शिवसेना पुन्हा एकत्र येणार अशा बातम्या झळकू लागल्या. मुळात दोन्ही पक्षातील अन्य नेत्यांना आत काय घडलं आहे याची माहिती नसल्याने जो तो आपआपल्या अंदाजाने व्यक्त होवू लागला. आता यानंतर कालच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले होते व दोन तास त्यांची चर्चा झाली. ते नागपूर विमानतळावर उतरतात न उतरतात तोच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पंतप्रधान कार्यालयात गेले आणि तासभर चर्चा करून परत आले. यानंतर तर महाराष्ट्राच्या राजकारणात उलाथापालथच व्हायची राहिली होती. जो तो अंदाज बांधू लागला. नंतर राष्ट्रवादीकडून याची माहिती दिली गेली. सहकार, बँकिंग यासारख्या विषयांवर मोदी व पवार यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत जे नवी दिल्लीतच आहेत ते पवार यांच्या गाडीत बसून अन्य नेत्यांना भेटण्यास गेल्याचे दिसले. यामुळे नक्की राजकीय काही घडतयं का? असा सवाल उपस्थित झाला. मुळात पवार हे दोन दिवसांपासून नवी दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी गेले आहेत. त्यांनी या काळात संरक्षणमंत्री राजनाथसिंह व केंद्रीयमंत्री पीयूष गोयल हे ही त्यांना भेटले आहेत.
हा झाला नवी दिल्लीतील भेटीगाठींचा सीलसीला..आता या भेटी कशासाठी झाल्या असतील असा अनेकांना प्रश्न पडला आहे. वास्तविक पाहता शरद पवार यांनी आपण नवी दिल्लीत पंतप्रधानांना भेटणार आहोत असे राज्यात कोठे जाहीरपणे सांगितले नव्हते. पण दोन दिवसापूर्वी ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटले होते व यात त्यांनी नक्की आपल्या संभाव्य भेटीची माहिती दिली असणार हे निश्चित. कारण पवार हे परिपक्व नेते असून विनाकारण सनसनाटी पसरवून आधीच सतत चर्चत असणार्या महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्नही करणार नाहीत. महाविकास सरकार हे जोवर पवारांची इच्छा तोवर.. असेच म्हंटले जाते. कारण काँगे्रस ही राष्ट्रवादीमुळे या आघाडीत सहभागी आहे. सध्याच्या राजकीय स्थिती पाहता पवार हे भाजपासोबत जातील असे कदापिही वाटत नाही. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात ग्रामीण भागापर्यंत रूजलेले पक्ष म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे पाहिले जाते. हे पक्ष एकत्र आले तर पुढील निवडणुकांमध्ये काहीतरी वेगळे घडू शकते असा त्यांचा अंदाज आहे.
भाजपा हा विस्तारवादी पक्ष असून तो युती, आघाडी, मैत्री करतो परंतु नंतर हळूहळू सहयोगी पक्षाचे अस्तित्व कमी करून आपल्यातच त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतो हे पवार जाणून आहेत. यातच ते ज्या विचारसरणीचे आहेत या भाजपा बसत नाही. आणि या वयात ते भाजपासारख्या पक्षाबरोबर जाण्याची सूतरामही शक्यता दिसत नाही. मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळे असते हे ते आणि मोदी दोघेही जाणतात.
भारतीय जनता पक्ष सध्या अलर्ट मोडवर असून देवेंद्र फडणवीस व त्यांची टीम राज्यात जबरदस्त विरोधीपक्षाची भूमिका वठवत आहेत. तीन पक्ष एका बाजूला असतानाही फडणवीस हे सरकारला अनेकदा घेरताना दिसतात. यामुळे जनाधार ही वाढत असल्याचा भाजपाचा अंदाज आहे. अशात आता विनाकारणच शिवसेना अथवा राष्ट्रवादीला खुणावून त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाणे हे लोकांना पचनी पडणार नाही. यामुळे जर कदाचित अन्य पक्षातील गरजे एवढे आमदार येवून मिळालेच तरच भाजपा सत्तेचा विचार करेल व याचीच शाळा अमितभाई शहा यांनी घेतली असावी व यासाठी दोन तास फडणवीस यांच्याशी चर्चा केली असण्याची शक्यता आहे. सध्या काही प्रकरण महाविकास आघाडी सरकारसाठी अडचणीची आहेत व यावरच भाजपाचे लक्ष आहे.
शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात चांगला समन्वय आहे. सातत्याने पवार व ठाकरे यांच्या भेटी होत असून ते दूरध्वनीपेक्षा प्रत्यक्ष भेटूनच चर्चा करत असल्याचे दिसत आहे. काँग्रेस पक्षातील नेते काहीवेळा फटकळ बोलून राजकीय वातावरण तापवत असले तरी सत्तेत असलेले मंत्री मात्र शांत आहेत. काँगे्रसचे आमदार ही सरकारला साथ देत आहेत. हे सारे पाहता पवार व मोदी यांच्या भेटीनंतर काही राजकीय घडेल असा अंदाज असणार्यांनी वाट पाहावी असे वाटते. कारण केंद्रात विरोधी पक्ष म्हणून ओळखला जाणार्या काँग्रेस पक्षाचे सर्वोच्य नेते हे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीलाही जात नाहीत आणि मोदी ही त्यांना भेटण्यात रस दाखवत नाहीत. यामुळेच पंतप्रधानांनी कदाचित अधिवेशनाच्या पूर्वी शरद पवार यांना भेटण्याची वेळ दिली. अनेक विषयांवर चर्चा केली असेल. कारण यातून राजकीय चर्चा होणार हे त्यांना माहीत असणारच परंतु त्यांच्या दृष्टीने शिवसेनेपेक्षा काँग्रेसपर्यंत संदेश पोहोचणे गरजेचे आहे आणि ते आजच्या पवारभेटीने नक्की झाले असणार हे निश्चित.