राजकिय

दत्तामामा समजावून थकले, आज जयंतराव पंढरपूर राष्ट्रवादीमधील वाद मिटविणार!


पंढरपूर तालुक्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विशेष लक्ष असून याच तालुक्यातील नेत्यांना खूप साथ केली आहे. कै. औदुंबरआण्णा पाटील, स्व. यशवंतभाऊ पाटील, स्व. राजाभाऊ पाटील, स्व. राजूबापू पाटील यांच्यासारख्या दिग्गजांनी पवार यांची कायम साथ केली आहे. याच बरोबर स्व. भारत भालके हे कोणत्याही पक्षात राहिले असले तरी कायम शरद पवार यांचे शिष्य म्हणूनच ओळखले जात होते. याच बरोबर स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्याबरोबर ही पवार यांचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. अशा या तालुक्यात राष्ट्रवादीत नवे आणि जुने असा जो वाद रंगत आहे यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.

पंढरपूर-  येथील राष्ट्रवादीमध्ये कै. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर नवे व जुने असा वाद रंगला असून यातच पोटनिवडणूक ही झाली. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपूरला आले होते व त्यांनी येथील राष्ट्रवादी व विठ्ठल परिवारातील वाद मिटविला मात्र निकालानंतर पुन्हा तो उफाळून आल्याने पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी यात हस्तक्षेप करत समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच उपयोग झाला नाही. यामुळे आज शनिवारी जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपूरला येत आहेत. ते येथील राष्ट्रवादी पदाधिकारी व विठ्ठल परिवारातील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर येथे राष्ट्रवादीत एकोपा वाढणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यामधील वादाची दखल थेट वरीष्ठ पातळीवरील नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान दोनच दिवसापूर्वी येथील नेते भगिरथ भालके व कल्याणराव काळे यांनी दस्तुरखुद्द शरद पवार यांची भेट घेतली होती. यामुळे त्यावेळीही काही सूचना दिल्या गेल्या असणार हे निश्‍चित आहे. राष्ट्रवादी काँगे्रसच्या स्थापनेपासून पंढरपूर तालुक राष्ट्रवादीमय राहिला आहे. कारण येथील मजबूत परिचारक गट त्यांच्यासमवेत होता. परंतु 2009 पासून याला सुरूंग लागला. मागील पाच वर्षापूर्वी तर सत्ता नसताना पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादीचे अस्तित्वच संपल्यात जमा होते. शहरात संदीप मांडवे, सुधीर भोसले, श्रीकांत शिंदे व महिला पदाधिकार्‍यांनी आंदोलने करून राष्ट्रवादी काही प्रमाणात जिवंत ठेवली. तर तालुक्यात स्व.राजूबापू पाटील, युवराज पाटील, अ‍ॅड. दीपक पवार, सुभाष भोसले, सुधीर भोसले हे  पक्षाबरोबरच राहिले. यापैकी काही पदाधिकारी हे स्व.भारत भालके यांच्या गटात होते. यामुळे 2009 चा अपवाद वगळता विधानसभेला स्व.भालके यांना कोणत्याही पक्षातून उमेदवारी मिळाली तरी ते त्यांच्या सोबत असत. परंतु त्यांनी शेवटची निवडणूक राष्ट्रवादीमधून लढल्यामुळे सर्वच गटतट एकत्र आले. स्व.भालके यांचा गट यामध्ये सहभागी झाला आणि तेव्हांपासून राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. विशेषतः स्व.भालके यांच्या निधनानंतर हा वाद चव्हाट्यावर आला आहे. एकाच पक्षात राहून दोन आंदोलने, दोन कार्यक्रम पार पडले. विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वीच भालके गटाविरोधात सभा झाली होती. यामुळे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील यांनी सर्व गटातटाची बैठक घेवून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. किंबहुना निवडणुकीत कोणी दगाफटका केला तर याद राखा असा सज्जड दमच दिला होता. दरम्यान पराभवानंतर काही दिवस शांत असलेल्या पदाधिकार्‍यांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला आहे. याबाबत वरीष्ठाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. भालके यांचा गट, काळे यांचा गट तसेच पहिल्यापासून राष्ट्रवादीत असणारा गट अशी विभागणी होताना दिसून येत आहे. या सर्वांना एकत्र करण्यासाठी काही दिवसापूर्वी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विश्रामगृह येथे बैठक घेतली. परंतु येथे त्यांच्या समोरच जोरदार वादावादी झाली. नेते मंडळी हमरीतुमरीवर आली होती. अखेर भरणे यांनी हा वाद मिटविण्यासाठी जयंत पाटील यांनी मध्यस्ती करावी अशी विनंती केली. त्यानुसार शनिवार 17 रोजी जयंत पाटील दुपारी दोन वाजता येथील विश्रामगृह येथे पदाधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत. यामध्ये तोडगा निघणार का याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close