राजकिय

राजकीय टोलेबाजीः खा. निंबाळकर म्हणतात, जिल्ह्यात राष्ट्रवादी औषधाला सुध्दा ठेवणार नाही!


अकलूज – अकलूज माळेवाडी नगरपरिषद व नातेपुते येथे नगरपंचायत व्हावी या मागणीसाठी मागील 25 दिवसांसपासून अकलूजकरांचे आंदोलन सुरू आहे. यात आता भाजपाचे नेते सहभागी होत असून  माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शुक्रवारी या आंदोलनास भेट दिली व राष्ट्रवादी आणि पवार यांच्यावर जबर टीका करून तोंडसुख घेतले. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यात आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष औषधाला सुध्दा ठेवणार नाही अशी भिष्मप्रतिज्ञा केली.
माळशिरस तालुक्याचा विकास होऊ नये आणि मोहिते पाटील राजकारणातून संपून जावेत अशी राष्ट्रवादीची सुप्त इच्छा आहे. परंतु आम्ही भाजपावाले आहोत, माळशिरस तालुक्यातच काय पण सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी औषधाला सुध्दा शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अकलूज येथे दिला.
यावेळी शिवतेजसिंह मोहिते पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.  खा. नाईक-निंबाळकर म्हणाले, विजयदादा बांधकाम मंत्री असताना त्यांनी बारामतीच्या गल्ली-बोळात रस्ते बांधले. आता त्याच बारामतीकरांनी राजकीय द्वेषापोटी नगरपरिषद व नगरपंचायतीची मंजुरी अडवून ठेवली आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. माळशिरस तालुक्याचा विकास होऊ नये म्हणून राष्ट्रवादीची धडपड सुरु आहे. पवार यांनी तुम्हाला 25 दिवस झाले रस्त्यावर आंदोलनासाठी बसवले आहे, त्यांना पुढील 25 वर्षे सत्तेवर येऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी आम्ही आग्रही आहोत. राज्य सरकारने जर मागणी केली तर केन्द्र सरकार निधीसाठी विशेष तरतूद करेल. पंढरपूर-लोणंद रेल्वेचे काम लवकरात लवकर सुरु होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
दरम्यान अकलूज व नातेपुतेकरांचे आंदोलन सुरू होवून आता पंचवीस दिवस झाले असून येथे भाजपाचे नेते व विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, महिला आघाडीच्या नेत्या चित्राताई वाघ, आमदार प्रशांत परिचारक व आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेटी दिल्या आहेत. 

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close