पावसामुळे भीमा निरा खोरे हाउसफुल्ल भरण्याच्या मार्गावर

उजनी व वीरमधून पाणी सोडले
पंढरपूर – सध्या सुरू असलेल्या पावसामुळे भीमा व निरा खोऱ्यातील धरण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. दहा प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. सध्या उजनीतून भीमा नदीच्या पात्रात 45 हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामध्ये घोड, चासकमान, भामा आसखेड, आंद्रा ,पवना, मुळशी खडकवासला व निरा खोऱ्यातील वीर धरणाचा समावेश आहे. उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही आता वाढत चालली आहे वरील प्रकल्पांमधून सुमारे 40 हजार
क्युसेकहून अधिक पाणी सोडले जात आहे. यामुळे दौंडची आवक वाढणार आहे. उजनी धरण १०४ टक्के भरलेले आहे.
सध्या भीमा व निरा खोऱ्यामध्ये पाऊस सुरू असून येथील प्रकल्प क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. येडगाव, कळमोडी , चासकमान , आंद्रा, पवना, कासारसाई, टेमघर, उजनी यासह निरा खोऱ्यातील भाटघर, नाझरे हे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर अनेक प्रकल्पांमध्ये 99 टक्क्यांपर्यंत जलसाठा झाला आहे
अन्य धरणांची स्थिती पुढील प्रमाणे – पिंपळगाव जोगे 89.68 टक्के , माणिकडोह 55, वडज 97.74, डिंभे 97.11, घोड 92, विसापूर 97.50 , चिल्हेवाडी 97.22 , भामा आसखेड 99.15, वडिवळे 97.86, मुळशी 98.75 , वरसगाव 98.60, पानशेत 98.83 ,खडकवासला 76, गुंजवणी 96.98, नीरा देवघर 98.49, वीर 99 टक्के.
कालपासून भीमा खोरे व घाटमाथा परिसरात पाऊस सुरू झाल्याने उजनी धरणात येणारी आवक वाढत असल्याने या प्रकल्पातून 45 हजार क्युसेक ने पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडले जात आहे. वीज निर्मितीसह 46 हजार 600 क्युसेक इतका आहे. तर निरा खोऱ्यातील वीर धरणातून पंधरा हजार क्युसेक चा विसर्ग सध्या सुरू आहे. जो सकाळी 25 हजार क्युसेक होता. दरम्यान उजनी व वीर मधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे भीमा नदी सोलापूर जिल्ह्यात पुन्हा दुथडी भरून वाहणार आहे.




